गोकुळच्या मतमोजणीवेळी नेमकं काय घडलं?, सतेज पाटील यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Gokul Milk Union Election : गोकुळच्या निकालानंतर मतमोजणीवरून उपस्थित झालेल्या प्रश्नांवर सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

News Photo   2026 10 25T145120.315

Gokul Milk Union Election

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत बहुमत (Gokul) मिळाल्यानंतर मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात नेमकं काय घडलं, याचा खुलासा सतेज पाटील यांनी केला आहे. पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी, त्यासंदर्भात घेतलेला कायदेशीर सल्ला आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेला निकाल, याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली.

सतेज पाटील म्हणाले की, ठोस कारण असल्याशिवाय पुन्हा मतमोजणी करता येत नाही, असा नियम आहे. यासंदर्भात वकिलांचा सल्ला घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यामुळे उर्वरित साडेपाच हजार मतांची पुन्हा मोजणी झाली नाही. आधीच्या मतमोजणीसाठीच संपूर्ण दिवस गेला होता. पुन्हा मतमोजणी केली असती, तर पहाटेचे 5 वाजले असते. त्यामुळे पुन्हा मतमोजणी न करण्याचा निर्णय योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घेत 13-12 असा निकाल जाहीर केला.

सहकार क्षेत्रात चांगला आदर्श निर्माण करायचा असेल, तर अध्यक्ष निवडीच्या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावं आणि तांत्रिक मुद्द्यांपेक्षा लोकांनी दिलेल्या बहुमताचा विचार करावा, असं आवाहनही सतेज पाटील यांनी केलं. गोकुळचे 25 संचालक एकत्र येऊन संस्थेचा कारभार चांगल्या पद्धतीने करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वांनी एकोप्याने काम करून संस्था वाढवावी आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीआधी सतेज पाटलांची खेळी; संचालकांना पाठवले सहलीवर!

गोकुळच्या निकालात आपल्या गटाला बहुमत मिळाल्याचं सांगताना पाटील यांनी एका मतानेही विजय मिळू शकतो, याकडे लक्ष वेधलं. सहकार क्षेत्रात काम करणारे मुश्रीफ आणि कोरे यांच्यासारखे नेते या निकालाकडे कशा पद्धतीने पाहतात, याचा परिणाम राज्यातील सहकार क्षेत्रावरही होऊ शकतो, असं ते म्हणाले. त्यामुळे 29 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत सर्व संचालक उपस्थित राहून कोरम पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी 29 ऑक्टोबर रोजी निवड होणार आहे. या निवडीपूर्वीच सतेज पाटील यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाची घोषणा केली होती. संस्थेची उभारणी करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाला अध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. याबाबत आपण सकारात्मक असून सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, असंही पाटील यांनी सांगितलं.

यापूर्वी शशिकांत पाटील चुयेकर यांचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याची चर्चा होती; मात्र त्यांना तेव्हा पद मिळालं नव्हतं. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये नविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी शशिकांत पाटील चुयेकर यांना अध्यक्ष करण्याची भूमिका घेतली. निवडणुकीदरम्यान त्यांनी शशिकांत पाटील यांच्यासाठी आणलेला गुलाल आणि हार पुन्हा एकदा वापरण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता 29 ऑक्टोबरच्या बैठकीत अध्यक्षपदाबाबत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागलं आहे.

Exit mobile version