शिंदे सेनेच्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला; राजकीय वातावरण तापलं, शिवसेना भवन परिसरातील सुरक्षा वाढवली

Shaina NC Controversy : सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या निषेधादरम्यान सायना एनसी यांच्याकडून चुकून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेला.

News Photo   2026 11 18T151426.224

Shaina NC Controversy

Shaina NC Controversy : ‘जर्नी ऑफ लव’ या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील मजकुरावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. सोनिया गांधी यांच्या या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करत शिवसेना शिंदे गटाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुस्तकातील मजकुराचा निषेध करत नेत्यांनी पुस्तकाच्या प्रती फाडल्या. मात्र, या आंदोलनादरम्यान शिंदे गटाच्या नेत्या सायना एनसी यांच्याकडून अनपेक्षित चूक घडली आणि राजकीय वादाला नवे वळण मिळाले.

पत्रकार परिषदेत सायना एनसी यांच्या हातात पुस्तकाऐवजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आला. तो फोटो असल्याचे लक्षात न आल्याने त्यांनी तो फाडला. ही बाब संजय निरुपम यांच्या लक्षात येताच त्यांनी सायना एनसी यांना याची जाणीव करून दिली. त्यानंतर त्यांनी फाडलेला फोटो बाजूला ठेवला. मात्र, या प्रकारामुळे शिंदे गटाच्या पत्रकार परिषदेतील आंदोलनापेक्षा बाळासाहेबांचा फोटो फाडल्याची घटना अधिक चर्चेत आली.

या प्रकारावर शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही सायना एनसी यांच्यावर टीका केली. सावरकरांच्या इतिहासाबाबत त्यांना किती माहिती आहे, असा सवाल करत त्यांनी शिंदे गटाच्या भूमिकेवरही निशाणा साधला. शिंदे गटाची विचारधारा खोक्यांपासून सुरू होते आणि खोक्यांवरच संपते, अशी टीका सावंत यांनी केली.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या प्रकारामुळे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वादाला नवे कारण मिळाले आहे. या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेता बाळासाहेब भवन परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्याची तयारी करण्यात येत आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातही या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version