जयकुमार गोरेंना मोठा धक्का! भाऊ शेखर गोरे 1 सप्टेंबरला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

शेखर गोरे 1 सप्टेंबरला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; भावाचं जयकुमार गोरेंना थेट आव्हान, साताऱ्यातील राजकीय समीकरणे बदलणार.

Shekhar Gore

Shekhar Gore

Shekhar Gore to Join Shinde’s Shiv Sena on September 1: सातारा जिल्ह्याच्या, विशेषतः माण-खटावच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड होणार आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे हे येत्या 1 सप्टेंबरला मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

सिप्लाच्या पुणे गोदामाचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

भाजप नेतृत्वावर नाराजी?

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाकडून, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलेला शब्द पाळला गेला नसल्याची नाराजी शेखर गोरे यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जाते. या नाराजीतूनच त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याची राजकीय चर्चा आहे.

सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पुण्यातून 5 हजार राख्या; दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचा उपक्रम

सातारा जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढत असताना महायुतीतील मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अपेक्षित राजकीय संधी मिळत नसल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शेखर गोरे यांच्या शिवसेना प्रवेशाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भावा-भावातील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत

शेखर गोरे आणि जयकुमार गोरे हे सख्खे भाऊ असले तरी दोघांमधील राजकीय संघर्ष जुना आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेखर गोरे यांनी जयकुमार गोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता शेखर गोरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरल्याने दोन्ही भावांमधील राजकीय संघर्षाला नवी धार मिळण्याची शक्यता आहे.

माण-खटावमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार?

शेखर गोरे यांचा माण आणि खटाव तालुक्यात मोठा जनसंपर्क असून, त्यांचे कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा फायदा पक्षाला स्थानिक पातळीवर होऊ शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

देशाचा मूड काय?, पंतप्रधानपदासाठी सर्वात जास्त पसंती कुणाला?, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? तिसरा नेता कोण?

दरम्यान, महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना हे मित्रपक्ष असतानाच भाजपच्या प्रभावी नेत्याच्या राजकीय प्रतिस्पर्ध्याला शिवसेनेने आपल्या गोटात घेतल्याने स्थानिक पातळीवरील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकांमध्ये काय होणार?

शेखर गोरे यांच्या प्रवेशानंतर माण-खटावमध्ये महायुतीच्या राजकारणाचे समीकरण कसे बदलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शेखर गोरे यांच्या गटाची भूमिका काय असेल, तसेच जयकुमार गोरे यांच्या राजकीय वर्चस्वाला ते किती आव्हान देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान 1 सप्टेंबरला होणाऱ्या पक्षप्रवेशानंतर माण-खटावच्या राजकारणात भाऊ विरुद्ध भाऊ असा संघर्ष पुन्हा एकदा केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version