मी 20 वर्षानंतर युती करतोय. या युतीमध्ये अनेकांना (Election) उमेदवारी देता आली काहीना नाही देता आली. काही रागावले, काही गेले काही राहिले. पण हे आमच्याही हातात राहत नाही. नाराज जे झाले त्यांची माफी मागतो असं म्हणत, आजच्या या सभेला बाळासाहेब, माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि मॉ साहेब उपस्थित असायला हव्या होत्या अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. ते आज मुंबई महानगर पालिका निवडणूक प्रचाराच्या प्रचारसभेत मुंबईतील शिवाजी पार्कमधील आयोजीत सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिरी उपस्थिते होते.
आम्ही एकत्र येण्याचं कारण म्हणजे मुंबईवर आलेलं संकट. अनेक वर्ष मी यावर बोलत आलो, कशा प्रकारचा डाव रचला जातो? राज्य सरकारने मध्यंतरी हिंदी सक्तीचा प्रस्ताव आणला. मी कडाडलो आणि उद्धव ठाकरेही कडाडले. त्यावेळी मुलाखत झाली, त्यामध्ये मी म्हणालो कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिथून या गोष्टीची सुरुवात झाली. तो हिंदी सक्तीचा विषय तुम्हाला चाचपडून पाहण्याचा होता. तुम्ही जागे आहात का? मराठी माणूस जिवंत आहे का? फक्त चाचपडणं होतं तुम्हाला.
आम्ही सोबत! मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, जयंत पाटलांनी शिवाजी पार्क मैदाना गाजवलं
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर या सरकारला काय फेफरं आलं माहीत नाही. मनाला वाटेल ते करायला लागले. आली कुठून हिंमत? कुणाला विचारायचं नाही, जनता नाही, काय नाही. आम्हाला वाटलं म्हणून केलं. हे कोण आहेत लोकं? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी या सभेत उपस्थित केला. दरम्यान पुढं बोलताना ते म्हणाले की, पैसे फेकले की विकत घेऊ, आला कुठून एवढा आत्मविश्वास? काँग्रेस सत्तेवर होती, अनेक लोक सत्तेत होती. पण ते लोकांना घाबरून असायचे. जनतेला घाबरून असायचे. आता घाबरणं बिबरणं काहीच नाही असा थेट वार राज ठाकरे यांनी केला आहे.
गृहित धरून टाकलंय तुम्हाला. कुठून येतात मतं यांच्याकडे कशी येतात? हे सर्व ठिकाणी सुरूच आहे. बोगस व्होटर आणि ईव्हीएम मशीनच्या लढाया सुरू आहेत. अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये काँग्रेसबरोबर भाजपने युती केली. ६६ जणं बिनविरोध निवडून आले, त्यांना मतदानच करू दिलं नाही. आज ६६ आहेत, उद्या आकडे वाढत जाणार. त्यांना कळलंय लोकांना कसंही विकत घेऊ शकतो. विकले जातात याचं वाईट वाटतं. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे ड्रग्स रॅकेटमधील माणसाला भाजपने तिकीट दिलं. तुमच्या नाकावर टिच्चून, बदलापूरमध्ये तुषार आपटे बलात्काराचा आरोपी त्याला नगरसेवक केलं. आली कुठून एवढी हिंमत, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला आहे.
