उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गेल्या अनेक दिवसांपासून युती (Alliance) कधी होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर या युतीला मुहूर्त मिळालाय. आज दुपारी 12 वाजता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार आहे. युतीच्या घोषणेआधी सकाळी 11 वाजता दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करणार आहेत. मात्र, आज जागावाटप जाहीर होणार नसून फक्त युतीची घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
2019 साली विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपा युतीची घोषणा याच हॉटेलमध्ये झाली होती. त्यावेळी अमित शाह उपस्थित होते. जुलै महिन्यातील मराठी विजय मेळावा आणि त्यानंतर वाढलेल्या भेटीगाठींमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र, ठाकरे बंधू युतीची अधिकृत घोषणा करणार कधी?, याची प्रतीक्षा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती.
मुंबई, ठाणे, पुणेसह या महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र; राऊतांनी दिला विरोधकांना इशारा
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालचं युतीचा मुहूर्त जाहीर केला होता. आज दुपारी 12 वाजताच्या मुहूर्तावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा केली जाणार आहे. मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. मुंबईसह इतरही महापालिकांमध्ये ही युती होणार असल्याची माहिती मिळत आहे.
ठाकरे बंधू शक्तिप्रदर्शन करणार
मुंबई महापालिकेत आपली मोट मजबूत असावी यासाठी शेवटच्या क्षणी का होईना, पण ठाकरे बंधूंची धडपड वाढलीय. विरोधकांनी याला नौटंकी म्हणताच संजय राऊतांनी खास त्यांच्या शैलीत पलटवार केला. नाटक नव्हे हा प्रीतिसंगम असं संजय राऊत म्हणाले. युतीची घोषणा करण्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचं समजतंय. हे शक्तिप्रदर्शन कोणत्या स्वरूपात असेल याची सर्वांनाच उत्सुकता असेल.
ठाकरे बंधूंची युती कुठं कुठं?
मुंबई
ठाणे
मिरा-भाईंदर
कल्याण-डोंबिवली
नवी मुंबई
नाशिक
पुणे
महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
मतदान- 15 जानेवारी 2026
मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026
दोन्ही ठाकरेंचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.
शिवसेना ठाकरे गट – 140 ते 150 जागांवर निवडणूक लढवणार.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष -60 ते 70 जागांवर निवडणूक लढवणार.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – 15 ते 20 जागा शिवसेना ठाकरे गटातील कोट्यातून सोडणार.
