Ban on unpackaged edible oil: खाद्यतेलाच्या सुरक्षिततेबाबत महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरासाठी 14कलमी आदेश जारी केला आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार खाद्यतेलाच्या उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीवर नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे तेल एक्स्पेलर, रिफायनरी, ब्लेंडर, आयातदार, घाऊक व किरकोळ विक्रेते तसेच ऑनलाइन विक्री करणाऱ्या प्लॅटफॉर्मनाही या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
अजितदादांनी बीडकरांना दाखवलेल्या विकासस्वप्नांची वीट चढतेय; ‘सी-ट्रिपलआयटी’ची गतीने उभारणी
सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी
FDAच्या आदेशानुसार खाद्यतेल सुट्या स्वरूपात विकता येणार नाही. तेलाची विक्री केवळ सीलबंद, छेडछाड झालेली नसल्याचे स्पष्ट करणाऱ्या आणि आवश्यक माहिती असलेल्या लेबलयुक्त पॅकेजमध्येच करावी लागणार आहे.
राणाजगजितसिंह पाटलांचे ‘ऑपरेशन लोटस’; एका दगडात किती पक्षी मारले ?
तसेच, एकदा वापरलेले तेलाचे टिनचे डबे पुन्हा तेल भरण्यासाठी वापरता येणार नाहीत. गंजलेले किंवा तडे गेलेले कंटेनर वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
तळणीचे तेल वारंवार वापरता येणार नाही
हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि इतर व्यावसायिकांसाठीही FDAने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. वारंवार तापवलेले किंवा पुन्हा पुन्हा तळणीसाठी वापरलेले तेल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
तेलामधील एकूण ध्रुवीय संयुगांचे (TPC) प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ते वापरता येणार नाही. असे वापरायोग्य नसलेले तेल अधिकृत RUCO (Repurpose Used Cooking Oil) संकलकांकडे देणे बंधनकारक असेल.
मोहरीच्या तेलाबाबतही कडक नियम
मोहरीच्या तेलाच्या विक्रीसंदर्भातही FDAने स्पष्ट नियम दिले आहेत. 8 जून 2021 नंतर बहुस्रोत खाद्यतेलामध्ये मोहरीच्या तेलाचे मिश्रण करण्यास बंदी आहे. त्यामुळे मोहरीचे तेल 100 टक्के शुद्ध स्वरूपातच विकावे लागणार आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मुळा उजवा-डावा कालवा, वांबोरी चारीला उद्यापासून पाणी…
याशिवाय खाद्यतेलामध्ये औद्योगिक ट्रान्स फॅटी अॅसिडचे प्रमाण 2 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे. अर्जेमोन, खनिज तेल आणि एरंडेल तेलाची उपस्थिती पूर्णतः प्रतिबंधित आहे.
नियम मोडल्यास लाखोंचा दंड
असुरक्षित खाद्यतेल विक्री किंवा वापराच्या प्रकरणात कारावासासह 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. अवमानक तेलासाठी 5 लाख, मिथ्याछाप तेलासाठी 3 लाख, परवान्याशिवाय व्यवसाय केल्यास 10 लाख आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी 10 लाख रुपयांपर्यंत शास्तीची तरतूद आहे.
ग्राहकांनीही काळजी घेण्याचे आवाहन
ग्राहकांनी केवळ सीलबंद आणि योग्य लेबल असलेले खाद्यतेल खरेदी करावे, तसेच खरेदीचे बिल घेणे आवश्यक असल्याचे FDAने स्पष्ट केले आहे. खाद्यतेलाबाबत तक्रार असल्यास FDAच्या तक्रार निवारण प्रणालीचा वापर करता येणार आहे.
तक्रार कुठे करायची?
खाद्यतेलाच्या विक्रीत किंवा गुणवत्तेबाबत काही गैरप्रकार आढळल्यास ग्राहकांना complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवता येईल. तसेच FDA टोल-फ्री 1800 222 365, FSSAI टोल-फ्री 1800 112 100 या क्रमांकांवर संपर्क करता येणार असून, ‘Food Safety Connect’ अॅपद्वारेही तक्रार दाखल करता येईल.
