वैजापुरात रोहित पठारे हत्या प्रकरणाने तणाव; आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचे आंदोलन, पालकमंत्र्यांचे तपासाचे आदेश

Rohit Pathare Murder : रोहित पठारे हत्या प्रकरणामुळे वैजापूरमध्ये तणाव निर्माण झाला असून, पालकमंत्री शिरसाट यांनी महत्त्वाचे निर्देश दिले.

News Photo   2026 11 07T210723.166

Rohit Pathare Murder Case

Rohit Pathare Murder Case : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये जुन्या वादातून रोहित पठारे या तरुणाची (Police) हत्या झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. 31 ऑक्टोबर रोजी येवला रोड परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी रोहितवर तलवार, लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या रोहितला उपचारासाठी शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, 3 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि भीमसैनिकांनी आरोपींच्या अटकेसाठी आंदोलन सुरू केले.

रोहितच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला. मंगळवारी रात्रीपासून वैजापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात नातेवाईक आणि भीमसैनिकांनी सुमारे चार तास रास्ता रोको आंदोलन केले. आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या प्रकरणात रोहितच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली आणि आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला. संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या तपासावरही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वैभव चव्हाण मृत्यू प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक, CID किंवा SIT चौकशीची मागणी, सरकारला दिला इशारा!

दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी आपली व्यथा मांडत पोलिसांच्या सुरुवातीच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी केल्या. त्यानंतर शिरसाट यांनी पोलिसांच्या तपास पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणाचा तपास तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे निर्देश दिले. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पीडित कुटुंबाला पाच लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी नेले जात असताना न्यायालय परिसरात गोंधळ निर्माण झाला. बाहेर जमलेल्या संतप्त भीमसैनिकांनी आरोपींच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.

रोहित पठारे हत्या प्रकरणामुळे वैजापूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. आंदोलन, आत्मदहनाचा प्रयत्न आणि न्यायालय परिसरातील गोंधळामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपासाला गती देण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

Exit mobile version