Vijay Wadettiwar on BJP Shinde Sena Rift: भाजप आणि एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपनंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यातच ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Pradip Purnekar) यांच्या हत्या प्रकरणावरूनही राजकीय वातावरण तापलं आहे. या सगळ्या घडामोडींवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि शिंदेसेनेला लक्ष्य केलं आहे. भाजपने आता ठरवून शिंदेसेनेची जिरवायला सुरुवात केली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, भाजप आणि शिंदेसेनेतील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांना चेकमेट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीतही हे पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. आता तर त्यांच्यातील संवादही संपल्याचं दिसत आहे. निधीच्या फायली अडवल्या जात असून, निधी वाटपावरूनही वाद सुरू आहेत. पूर्णेकर हत्या प्रकरणातील वादाला भाजपनेच हवा दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
“दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड धुसफूस सुरू आहे. तुम्ही नांदा, भांडा, काहीही करा; पण तुमच्या भांडणाचा परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर होता कामा नये. सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. दोघांच्या भांडणात सामान्य माणसाचे हाल होत आहेत. खाली कोणाचेही काम होत नाही. नवरा-बायकोसारखं यांचं भांडण सुरू आहे,” अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावलं आहे.
ब्रेकिंग-1 नोव्हेंबरला दिल्ली जाम होणार? राहुल गांधींची आंदोलनाची घोषणा!
दरम्यान, राज्यातील महायुती सरकार पडण्याची शक्यता वडेट्टीवार यांनी फेटाळून लावली. सरकारकडे बहुमत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली व्यवस्था व्यवस्थित करून ठेवली आहे. मित्रपक्षातील काही नेतेही त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सरकार कोसळेल, असं मला वाटत नाही, असं ते म्हणाले.
संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी
दुसरीकडे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यावरही वडेट्टीवार यांनी टीका केली. संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा अशा प्रकारे अपमान करणं योग्य नाही. सरकारला शेतकऱ्यांबद्दल संवेदना असतील, तर त्यांनी गायकवाड यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘तुंबाड’मधील अजरामर हस्तरच्या रूपात ओरीचा हॅलोविन अवतार; लोककथेला दिला ‘पॉप’ कल्चरचा अनोखा तडका
शेतकऱ्यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला आमदार म्हणून राहण्याचा अधिकार नाही. संबंधित पक्षाने त्यांचं निलंबन करावं आणि सरकारनेही पुढील कारवाई करावी. डिसेंबरच्या अधिवेशनात प्रस्ताव आणून त्यांना निलंबित करावं, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यापूर्वीही त्यांनी अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्यं केली आहेत. त्यांच्या बोलण्याला मर्यादा राहिलेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
