Voting process for Ahilyanagar District Bank elections today : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून, या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या विखे-थोरात यांच्या सहकार पॅनलसमोर खासदार निलेश लंके यांच्या परिवर्तन पॅनलचे आव्हान असणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेवर नेमके कोणाचे वर्चस्व राहणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. त्यापैकी 11 जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत एकूण 3 हजार 837 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये 33 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या दहा जागांवरील निकाल जिल्हा बँकेच्या सत्तेचे समीकरण ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या निवडणुकीत विखे-थोरात यांचे सहकार पॅनल आणि खासदार निलेश लंके यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे विखे आणि थोरात यांची सहकार क्षेत्रातील ताकद, राजकीय अनुभव आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव पणाला लागला आहे, तर दुसरीकडे खासदार निलेश लंके यांनी परिवर्तनाचा नारा देत या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ जिल्हा बँकेतील संचालक निवडीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई बनली आहे.
फ्लोरिडामध्ये विमान अपघाताचा थरारक VIDEO! रस्त्यालगत कोसळताच आगीचा भडका, विमानातील सर्व 9 जणांचा मृत्यू
मात्र, या संपूर्ण निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी आणि प्रतिष्ठेची लढत पारनेर मतदारसंघात रंगणार आहे. कारण या मतदारसंघातून स्वतः खासदार निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात भाजप नेते सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे मैदानात आहेत. त्यामुळे पारनेरमधील ही लढत केवळ दोन उमेदवारांमधील सामना न राहता निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी राजकीय प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिली जात आहे.
पारनेरमध्ये निलेश लंके यांना मतदार किती साथ देतात आणि राहुल शिंदे यांच्या माध्यमातून विखे गट किती प्रभाव दाखवतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. या लढतीचा परिणाम केवळ पारनेरपुरता मर्यादित न राहता जिल्हा बँकेतील सत्तेच्या गणितावरही होऊ शकतो. दरम्यान, मतदानाच्या माध्यमातून मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे आज स्पष्ट होणार आहे. सहकार पॅनल आपले वर्चस्व कायम राखणार की परिवर्तन पॅनल जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात मोठा बदल घडवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा बँकेची ही निवडणूक विखे-थोरात यांच्या प्रतिष्ठेची ठरणार की निलेश लंके परिवर्तन घडवणार, याचे उत्तर आता मतपेटीतूनच मिळणार आहे. आजच्या मतदानातून जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणातील पुढील सत्तासमीकरणाची दिशा ठरणार आहे.
