अन्न व औषध प्रशासनात तीन महिन्यात काय झालं?; वाचा, तुकाराम मुंढे यांचा वादळी ‘ॲक्शन’ रिपोर्ट

Tukaram Mundhe FDA Action : जून ते ऑगस्ट 2026 या तीन महिन्यांत औषध उत्पादन व विक्री आस्थापनांची मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली.

News Photo   2026 09 11T194915.385

What actions did Tukaram Mundhe take, and to what extent, after assuming charge of the FDA?

Tukaram Mundhe FDA Action : अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी औषधांची गुणवत्ता आणि अन्नसुरक्षेच्या प्रश्नावर कारवाईला वेग दिला आहे. (FDA)  जून ते ऑगस्ट 2026 या तीन महिन्यांत राज्यातील औषध उत्पादन व विक्री आस्थापनांची मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली. या कालावधीतील कारवाईचा अहवाल समोर आला असून, नियमभंग करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

या तीन महिन्यांत राज्यातील 2,902 औषध उत्पादन आणि विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 880 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये औषध उत्पादन करणाऱ्या 607 आस्थापनांपैकी 140, तर औषध विक्री करणाऱ्या 2,295 आस्थापनांपैकी 740 आस्थापनांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतर संबंधित परवानाधारकांवर नियामक कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान 104 शोध व जप्ती मोहिमा राबवण्यात आल्या. त्यातून सुमारे 11.41 कोटी रुपयांचा अवैध औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. गंभीर प्रकरणांमध्ये 20 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 21 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या अहवालात देण्यात आली आहे. औषध विक्रीतील अनियमितता, अनधिकृत साठा आणि नियमबाह्य उत्पादन यांसारख्या बाबींवर या कारवाईत लक्ष केंद्रित करण्यात आले.

पुण्यात तब्बल 4 ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त, गणेशोत्सवाआधी FDA ची बुधवार पेठेत मोठी कारवाई

मुंढे यांच्या कार्यकाळात केवळ छापे आणि जप्तीपुरती कारवाई मर्यादित राहिलेली नाही, तर औषधांच्या गुणवत्तेची तपासणीही वाढवण्यात आली आहे. जून ते ऑगस्टदरम्यान 37,604 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले, तर 32,604 नमुन्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली. त्यापैकी 15,268 नमुने निर्धारित निकषांनुसार नसल्याचे आढळले. यामध्ये 34,584 अन्न नमुने आणि 3,020 औषध व सौंदर्यप्रसाधनांचे नमुने यांचा समावेश होता.

औषध उत्पादन केंद्रांच्या तपासणीतही गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. काही आस्थापनांमध्ये सक्षम तांत्रिक मनुष्यबळाचा अभाव, उत्पादन प्रक्रियेच्या नोंदी अपूर्ण असणे, निर्जंतुकीकरणाच्या नोंदी न ठेवणे आणि ऑटोक्लेव्ह रेकॉर्डमध्ये विसंगती आढळली. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची औषधे तयार होत असल्याचे, तसेच परवान्यात मंजूर नसलेल्या औषधांचे उत्पादन होत असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे उत्पादन आणि विक्री व्यवस्थेतील त्रुटींवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

कारवाई पुढेही सुरू राहणार

गंभीर किंवा वारंवार नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर कारणे दाखवा नोटीस आणि सुनावणीची संधी दिल्यानंतर कायद्यानुसार परवाने निलंबित किंवा रद्द करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण औषधे मिळावीत, तसेच अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन व्हावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाची ही कारवाई आगामी काळातही अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version