Indian Stock Market : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर गेल्याकाही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) गुंतवणूकदांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. मात्र बाजाराने जोरदार यू-टर्न घेतल्याने गुंतवणूकदारांनी अवघ्या दोन तासात 4.50 लाख कोटींची कमाई केली आहे. बुधवारी रात्री डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी सकाळी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह सुरु झाला होता.
गुरुवारी सकाळी सेन्सेक्स 700 पेक्षा जास्त अंकांनी घसरुन व्यवहार करत होता. मात्र दुपारी 1.30 नंतर बाजारात मोठी रिकव्हरी दिसून आली आणि याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला.
भीती अन् रिकव्हरी
गुरुवारी सकाळी भारतीय शेअर बाजारात 50 टक्के टॅरिफची भीती दिसून येत होती. याच कारणाने सेन्सेक्स सकाळी तब्बल 300 अंकांनी घसरुन 80,262.98 अंकांवर उघडला तर दुपारी 1. 30 नंतर सेन्सेक्स (Sensex) 732 अंकांनी घसरला आणि 79,811.29 अंकांसह दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. तर दुसरीकडे नेफ्टी50 मध्ये देखील गुरुवारी सकाळी घसरण दिसून आली. गुरुवारी सकाळी निफ्टी50 (Nifty 50) 100 अंकांनी घसरून 24,464 अंकांवर उघडला.
शेअर बाजाराने घेतला यू-टर्न
सकाळी मोठी घसरण होत असताना दुपारी 1.30 नंतर शेअर बाजाराने यू-टर्न घेण्यास सुरुवात केली. गुरुवारी शेअर बाजार बंद होण्यापूर्वी सेन्सेक्सने 900 अंकांपेक्षा जास्त उडी मारली. सेन्सेक्सने 926.26 अंकांनी वाढून बाजार बंद होण्याच्या सुमारे 5 मिनिटे आधी 80,737.55 अंकांच्या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचला आणि बाजार बंद होताना सेन्सेक्स 80,623.23 अंकांवर होता. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये देखील दुपारनंतर वाढ दिसून आली. बाजार बंद होण्याच्या वेळी 24,596.15 अंकांवर व्यवहार करत होता.
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम करावे : तुषार कुटे
गुंतवणूकदारांना 4.50 लाख कोटींचा नफा
भारतीय शेअर बाजारात दुपारनंतर आलेल्या तेजीनंतर गुरुवारी गुंतवणूकदारांना 4.50 लाख कोटींचा फायदा झाला. दुपारी बीएसईचे मार्केट कॅप 4,40,87,150.80 कोटी रुपये होते. जे शेअर बाजार बंद होईपर्यंत 4,45,35,676.87 कोटी रुपयांवर आले.