Lung Cancer : फुफ्फुसांचा कर्करोग हा बहुतेकदा धुम्रपानाशी (Lung Cancer) संबंधित असतो. फुफ्फुसातील पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि ट्यूमर तयार करतात तेव्हा फुफ्फुसांच्या योग्यरित्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. अशावेळी फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो. हा ट्यूमर शरीराच्या इतर भागात देखील पसरू शकतो. जगभरातील मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी फुफ्फुसांचा कर्करोग हे एक प्रमुख कारण आहे. अलीकडच्या काळातील परिस्थिती पाहता धूम्रपान न करणाऱ्यांनाही या आजाराचे निदान मोठ्या प्रमाणावर होत आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या 20% पर्यंत प्रकरणे अशा लोकांमध्ये आढळतात ज्यांनी कधीही धूम्रपान केले नाही.
धुम्रपान करणाऱ्यांचा आजार मानल्या जाणाऱ्या फुफ्फुसांच्या कर्करोगात आश्चर्यकारक बदल झाला आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या एकूण प्रकरणात 20 टक्के रुग्ण असे आहेत की ज्यांनी कधीही स्मोकिंग केलेले नाही.
आशिया खंडातील देशांत हा आकडा जवळजवळ 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच या लोकांनी यापूर्वी कधीही धूम्रपान केलेले नाही. विशेषतः महिलांमध्ये परिस्थिती अधिक भयावह आहे. धुम्रपान न करणाऱ्यांमध्ये या आजाराच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे शास्त्रज्ञांना आश्चर्य तर वाटलेच आहे परंतु फुफ्फुसाच्या कर्करोगाशी संबंधित संशोधनाकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनही बदलला आहे.
फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण म्हणजे वायू प्रदूषण. विशेषतः पीएम 2.5 (PM2.5) पार्टिक्युलेट मॅटर (कणयुक्त पदार्थ). हे कणयुक्त पदार्थ ज्यांचा व्यास 2.5 मायक्रोमीटरपेक्षा कमी असतो ते फुफ्फुसांच्या ऊतींमध्ये खोलवर जाऊ शकतात आणि रक्तप्रवाहात देखील प्रवेश करू शकतात. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की पीएम 2.5 च्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने फुफ्फुसांच्या कर्करोगाशी, विशेषतः धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये जवळचा संबंध येतो.
रेडॉन वायूचा संपर्क हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे आणखी एक कारण आहे. रेडॉन हा गंधहीन, रंगहीन किरणोत्सर्गी वायू आहे जो माती आणि खडकांमध्ये युरेनियमच्या क्षयातून नैसर्गिकरित्या निर्माण होतो. हा वायू पाया किंवा भिंतींमधील भेगांमधून घरात शिरू शकतो. अमेरिकेत फुफ्फुसांच्या कर्करोगाचे दुसरे प्रमुख कारण रेडॉन आहे आणि धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये या आजाराचे हे एक प्रमुख कारण आहे.
झोपेचा अभाव आरोग्यासाठीच नाही तर नातेसंबंधांसाठीही हानिकारक! ‘इतक्या’ तासांची झोप आवश्यकच
मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) आणि एपस्टाईन-बार विषाणू यांसारखे काही प्रकारचे विषाणू देखील या कर्करोगाचा धोका वाढवतात. सेकंड हँड स्मोकिंग म्हणजे असे लोक जे धूम्रपान करत नाहीत परंतु इतरांच्या संपर्कात आल्याने त्यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचा त्रास होऊ शकतो. याशिवाय जीन्स देखील या आजाराचे एक प्रमुख कारण आहेत. स्वयंपाक करताना होणारे प्रदूषण, जसे की लाकूड किंवा शेणाच्या गोवऱ्या जाळल्यामुळे होणारे प्रदूषण फुफ्फुसांसाठी धोकादायक ठरू शकते.