एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांसाठी गुडन्यूज; CCMP कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची MMC मध्ये होणार नोंद

Homeopathy Doctors News : राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांसाठी राज्य सरकारने एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सीसीएमपी (Certificate Course in Modern Pharmacology) कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या स्वतंत्र नोंदवहीत करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांंना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे डॉक्टरांना आता मर्यादीत स्वरुपात का होईना आधुनिक औषधोपचार करता येणार आहेत.
याआधी राज्य सरकारने 2014 मध्ये होमिओपॅथी डॉक्टरांसाठी सीसीएमपी कोर्स (Homeopathy Doctors) सुरू केला होता. आधुनिक औषधशास्त्रावर आधारीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम असा हो कोर्स होता. राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्याचा उद्देश यामागे होता. या कोर्सच्या संदर्भात सरकारने 30 जून 2025 रोजी एक आदेशही प्रसिद्ध केला होता. हा कोर्स पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे करावी असे या आदेशात नमूद करण्यात आले होते.
होमिओपॅथी डॉक्टरांना राज्य सरकारचा दणका! ॲलोपॅथी उपचाराची परवानगी रद्द, निर्णय घेतला मागे
आयएमएला न्यायालयात दणका
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आरोग्य क्षेत्रात मात्र संघर्षाची ठिणगी पडली होती. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (Indian Medical Assosiation) पुणे शाखेने थेट मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली. न्यायालयात काहीतरी होईल अशी अपेक्षा संघटनेला होती. मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कोणताच दिलासा दिला नाही. न्यायालयाने राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.
उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्य सरकारने पुढील कार्यवाही सुरू केली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने आज अधिकृत शासन आदेश प्रसिद्ध केला. सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंद एमएमसीच्या स्वतंत्र नोंदवहीत करावी अशा सूचना दिल्या आहेत. सरकारच्या या आदेशामुळे राज्यातील तब्बल एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या डॉक्टरांना मर्यादीत स्वरुपात आधुनिक पद्धतीने रुग्णांवर औषधोपचार करता येणार आहे. अॅलोपॅथी डॉक्टरांना आता यात कोणतीही आडकाठी आणता येणार नाही.
बुलढाण्यातील ‘केस गळती’ची मोदी सरकारकडून दखल; दिल्ली, चेन्नईतील डॉक्टरांची पथकं येणार