Strong investor response to NSE IPO : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया अर्थात NSE चा बहुप्रतीक्षित 22,569 कोटी रुपयांचा आयपीओ आज, गुरुवारी (17 सप्टेंबर) सकाळी 10 वाजता गुंतवणूकदारांसाठी खुला झाला. आयपीओ सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात तो 12 टक्के सबस्क्राइब झाला असून, NII आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंजचा हा आयपीओ भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे.
NSE आयपीओसाठी प्रति शेअर 1,700 ते 1,785 रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला असून, गुंतवणूकदारांना 21 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. शेअर्सचे अलॉटमेंट 22 सप्टेंबर रोजी होण्याची अपेक्षा आहे, तर 24 सप्टेंबर रोजी शेअर्सचे लिस्टिंग नियोजित आहे. ग्रे मार्केटमध्येही NSE च्या शेअर्सना चांगली मागणी दिसत असून, विविध प्लॅटफॉर्मनुसार जीएमपी सुमारे 9 टक्क्यांपर्यंत आहे. इन्व्हेस्टरगेन नुसार जीएमपी 162 रुपये असून, त्यावरून सुमारे 9.08 टक्के संभाव्य लिस्टिंग प्रीमियम सूचित होत आहे. मात्र जीएमपी हा अनधिकृत बाजारातील संकेत असून प्रत्यक्ष लिस्टिंग नफ्याची हमी देत नाही.
आयपीओ पूर्वी NSE ने अँकर गुंतवणूकदारांकडून 6,746.2 कोटी रुपये उभारले आहेत. एलआयसीसह गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल, मॉनिटरी ऑथारिटी ऑफ सिंगापूर, फाइडलीटी, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथारिटी, निप्पोन लाईफ आणि एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स यांसारख्या संस्थांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे. प्राइस बँडच्या वरच्या स्तरावर NSE चे मूल्यांकन सुमारे 4.42 लाख कोटी रुपये होते. विशेष म्हणजे 22,569 कोटी रुपयांचा हा संपूर्ण IPO ऑफर फॉर सेल स्वरूपाचा आहे.
20 दिवसांच्या उपोषणात मनोज जरांगेंनी काय मिळवलं? कोणत्या मागण्या मान्य, कोणत्या अजून प्रलंबित?
NSE च्या व्यवसायाची आकडेवारीही मजबूत वाढ दर्शवते. आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत एक्सचेंजवरील लिस्टिंग कंपन्यांची संख्या 3,005 वर पोहोचली असून त्यांचे एकूण बाजार भांडवल 474 लाख कोटी रुपये झाले आहे. निफ्टी निर्देशांकांशी जोडलेल्या भारतीय पॅसिव्ह फंडांची एकूण AUM देखील 9 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
दरम्यान, NSE आयपीओ बाबत ब्रोकरेज संस्थांची मते वेगवेगळी आहेत. रेलिगेरने आयपीओला ‘न्यूट्रल’ रेटिंग देताना व्यवहार शुल्कावरील मोठे अवलंबित्व, डेरिव्हेटिव्ह्ज व्यवसाय, नियामक बदल, सायबर सुरक्षा आणि तंत्रज्ञानाशी संबंधित जोखमींकडे लक्ष वेधले आहे. मात्र NSE चे बाजारातील नेतृत्व, मजबूत ब्रँड, मोठी तरलता, एकात्मिक व्यवसाय मॉडेल आणि सातत्याने निर्माण होणारा कॅश फ्लो या कंपनीच्या जमेच्या बाजू असल्याचेही म्हटले आहे.
प्रति शेअर 1,785 रुपयांच्या वरच्या किंमतीवर NSE चे मूल्यांकन आर्थिक वर्ष 2025-26 मधील नफ्याच्या सुमारे 43 पट असल्याचे 129 वेल्थचे फंड मॅनेजर प्रसेनजित पॉल यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते NSE चा व्यवसाय मूलभूतदृष्ट्या मजबूत असला तरी हे मूल्यांकन स्वस्त नाही. दुसरीकडे, स्वस्तिकाने NSE च्या बाजारातील मजबूत नेतृत्वाचा उल्लेख करत आयपीओलाला सबस्क्राईब रेटिंग दिले आहे.
