What Is Silent Call Scam? : मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल येतो. आपण कॉल उचलतो, “हॅलो” म्हणतो आणि समोरून कोणताही प्रतिसाद न देता कॉल अचानक कट होतो. अनेकांना हा नेटवर्कचा किंवा तांत्रिक बिघाडाचा प्रकार वाटतो. मात्र प्रत्यक्षात हा ‘सायलेंट कॉल स्कॅम’ असू शकतो. सायबर गुन्हेगारांकडून वापरली जाणारी ही नवी युक्ती सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. नेमका कसा केला जातो सायलेंट कॉल स्कॅम? बचावासाठी काय करावं? याविषयी जाणून घेऊया…
नेमका काय असतो सायलेंट कॉल स्कॅम?
सगळ्यात पहिले तर, सायलेंट कॉल स्कॅम नेमका काय तर, सायबर गुन्हेगार हजारो मोबाईल क्रमांकांवर एकाच वेळी ऑटोमेटेड कॉलिंग सिस्टीमद्वारे कॉल करतात. कॉल उचलल्यानंतर समोरची व्यक्ती “हॅलो” म्हणताच संबंधित नंबर सक्रिय असल्याची माहिती स्कॅमर्सना मिळते. यानंतर कॉल तात्काळ कट केला जातो. त्यानंतर हा नंबर “अॅक्टिव्ह युजर” म्हणून चिन्हांकित केला जातो आणि पुढील फसवणुकीसाठी किंवा स्पॅम कॉल्ससाठी वापरल्या जाणाऱ्या यादीत समाविष्ट केला जातो. सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा नंबरवर नंतर बँकिंग फसवणूक, केवायसी अपडेट, लॉटरी, गुंतवणूक किंवा डिजिटल अरेस्ट यांसारख्या विविध प्रकारच्या स्कॅमसाठी संपर्क साधला जाऊ शकतो.
सायलेंट कॉल आल्यानंतर काय करावे?
हे झालं सायलेंट कॉल स्कॅमबाबत पण, असा कॉल तुम्हाला आला तर, नेमकं काय करायचं तर, यासाठी सायबर तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कॉल उचलल्यानंतर समोरून प्रतिसाद मिळत नसेल तर, तात्काळ कॉल कट करा. एकाच नंबरवरून वारंवार सायलेंट कॉल येत असतील तर, तो नंबर ब्लॉक करा. याशिशिवाय तुम्ही संशयास्पद नंबरची तक्रार राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर करू शकता.
If you are receiving silent calls from unknown numbers, do not ignore them. pic.twitter.com/PHzBXNnbJR
— CyberDost I4C (@Cyberdost) June 8, 2026
वैयक्तिक माहिती देणे टाळा
अनेक जण कॉल कट झाल्यानंतर उत्सुकतेपोटी त्या नंबरवर परत फोन करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते ही मोठी चूक ठरू शकते. त्यामुळे सायलेंट कॉल करणाऱ्या नंबरवर परत कॉल करू नका. कॉलमधील लिंक, संदेश किंवा सूचनांवर विश्वास ठेवू नका. अनोळखी व्यक्तींसोबत बँक खाते, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
फसवणुकीचा संशय आल्यास कुठे तक्रार कराल?
सायबर गुन्ह्यांचा संशय आल्यास त्वरित 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच भारत सरकारच्या सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवरही तक्रार करता येते. डिजिटल युगात फसवणुकीचे प्रकार अधिकाधिक आधुनिक होत आहेत. “हॅलो” म्हणताच कॉल कट होणे ही किरकोळ गोष्ट वाटू शकते, मात्र अशा छोट्याशा कृतीमुळे तुमचा नंबर स्कॅमर्सच्या डेटाबेसमध्ये पोहोचू शकतो. त्यामुळे अनोळखी नंबरवरून येणाऱ्या सायलेंट कॉल्सबाबत सतर्क राहणे आणि योग्य वेळी तक्रार करणे हेच सायबर फसवणुकीपासून बचावाचे सर्वात प्रभावी शस्त्र ठरू शकते.
