डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बाजारात आलं ‘USB कंडोम’; मोबाईल चार्ज करताना नक्की काय होणार?
USB Condom सायबर भामटे सार्वजनिक चार्जिंग पॉईंट्सचा गैरवापर करून 'जूस जॅकिंग' सारख्या सायबर हल्ले करत आहेत.
What Is USB Condom, How Its Work’s On Mobile : जर तुम्ही रेल्वे स्टेशन, विमानतळ किंवा मॉलमध्ये जाताच मोबाईल चार्जिंगसाठी ‘युएसबी पॉईंट’ शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. तुमची ही सवय तुम्हाला एका झटक्यात रस्त्यावर आणू शकते. सायबर गुन्हेगारांनी आता लोकांची हीच गरज ओळखून ‘जूस जॅकिंग’ (Juice Jacking) नावाचा नवा सापळा रचला आहे. सार्वजनिक चार्जिंग पोर्ट्सच्या माध्यमातून तुमच्या फोनमध्ये व्हायरस सोडून बँक डिटेल्स आणि पासवर्ड चोरले जात आहेत. पण घाबरू नका, यावर एक नामी उपाय बाजारात आला आहे, ज्याचं नाव आहे ‘USB कंडोम’ ज्याला USB डेटा ब्लॉकर असेही म्हटले जाते. हे गॅझेट नेमकं काय? आणि ते कसं काम करतं? त्याबद्दल जाणून घेऊया…
पूर्वी एक झोप झाली की, मिळायचा ‘हाफ टाईम’ मग, आपण झोपेच्या 8 तासांच्या चक्रात कसे अडकलो?
‘जूस जॅकिंग’ (Juice Jacking) म्हणजे काय?
हा एक प्रकारचा आधुनिक सायबर हल्ला आहे. सार्वजनिक युएसबी पोर्टमध्ये हॅकर्स आधीच छुप्या पद्धतीने ‘मॅलवेअर’ म्हणजेच एक प्रकारचा व्हायरस टाकून ठेवतात. तुम्ही तुमचा फोन चार्जिंगसाठी जोडताच, हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये शिरतो आणि तुमच्या नकळत सर्व महत्त्वाची माहिती चोरांपर्यंत पोहोचवतो. अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) प्रणालींमध्ये मजबूत सुरक्षा असली, तरी हा धोका पूर्णपणे टळलेला नाही.
‘USB कंडोम’ नेमकं काय?
वाढत्या सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी आता ‘USB कंडोम’ किंवा ‘USB डेटा ब्लॉकर’ नावाचे डिव्हाइस अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. हे एक अतिशय लहान आणि खिशातील पेनड्राईव्हसारखे दिसणारे डिव्हाइस आहे. जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करता, तेव्हा हा डेटा ब्लॉकर तुमच्या फोनच्या चार्जिंग केबल आणि सार्वजनिक चार्जिंग पोर्टच्या मध्ये लावला जातो.
वयाची चाळीशी गाठूनही ऐंशी-नव्वदीत जन्मलेली पिढी तरूण कशी? GenZ शोधत असलेलं उत्तर सापडलं
USB कंडोमचे फायदे काय?
हे डिव्हाइस तुमच्या फोनला चार्जिंगसाठी आवश्यक असलेला विद्युत प्रवाह तर पुरवते, मात्र डेटा ट्रान्सफर करणारी यंत्रणा पूर्णपणे ब्लॉक करते. फोन सुरक्षितपणे चार्ज होतो, पण सायबर चोरांना तुमच्या फोनमधून कोणतीही फाईल, पासवर्ड किंवा बँक डिटेल्स चोरता येत नाहीत.हे छोटसं गॅझेट तुम्ही फोन, टॅब्लेट किंवा लॅपटॉप अशा कोणत्याही उपकरणासाठी वापरू शकता.
डिव्हाइस कोण खरेदी करू शकते?
हे डिव्हाइस कोणतीही व्यक्ती अगदी सहज खरेदी करू शकते. विशेषतः अशा लोकांनी हे गॅझेट नक्कीच सोबत बाळगावे, ज्यांना प्रवासादरम्यान किंवा कामानिमित्त वारंवार बाहेर राहावे लागते आणि सार्वजनिक चार्जिंग पॉईंट्सचा वापर करावा लागतो.
कुठे मिळतं आणि किंमत किती?
USB कंडोम किंवा USB डेटा ब्लॉकर हे डिव्हाइस खरेदी करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या अमेझॉन सारख्या कोणत्याही प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून हे ऑनलाइन मागवू शकता. सर्च बारमध्ये ‘USB Data Blocker’ टाईप केल्यास तुम्हाला विविध कंपन्यांचे पर्याय दिसतील. ऑनलाईन मार्केटमध्ये हे डिव्हाइस वेगवेगळ्या किमतीत उपलब्ध आहे. साधारणपणे 999 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत हे बाजारात विकले जात आहे.
(डिस्क्लेमर: वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित असून, याबाबत लेट्सअप मराठी कोणताही दावा करत नाही. अधिक सुरक्षिततेसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)