बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) शेवटचं लीड मिळालं होतं 2009 साली. सुळेंना 62 हजार 700 आणि भाजपच्या कांता नलावडेंना 32 हजार 500. त्यानंतर लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या चार निवडणुका झाल्या. पण राष्ट्रवादीला (NCP) लीड मिळालं नाही. ना लोकसभेला ना विधानसभेला. मागच्या दहा-बारा वर्षांत खडकवासला राष्ट्रवादीला प्रतिकूल राहिला आहे. पण अशा मतदारसंघातूनही अजितदादांनी सुनेत्रा पवारांना एक लाखाचं लीड मिळून देण्याच टार्गेट ठेवले आहे. त्यासाठी त्यांना अर्थात भाजपची मोठी मदत होणार आहे. पण फक्त भाजपच्या (BJP) यंत्रणेवर अवलंबून राहण्याऐवजी त्यांनी स्वतःही फिल्डिंग लावली आहे. महायुतीचा फौजफाटा सात दिवस राखीव ठेवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. याशिवाय इथला हजारो सदनिकांचा प्रमुख प्रश्नही मनावर घेतला आहे. (Ajit Pawar and Supriya Sule have put their strength to the test in Khadakwasla assembly constituency)
पण अजितदादांनी खडकवासल्यात एवढे लक्ष का घातले आहे? राष्ट्रवादीसाठी नेहमीच अवघड राहिलेला पेपर सोडवण्याचं शिवधनुष्य अजितदादांनी का उचललं आहे? तेच आपण पाहू.
बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, खडकवासला आणि दौंड असे सहा मतदारसंघ येतात. बारामती, भोर, पुरंदर आणि दौंड इथले मतदान अत्यंत चुरशीने होण्याची आणि गणित कुठेतरी बरोबरी सुटण्याची चिन्ह दिसत आहेत. बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोघांचाही होल्ड आहे. भोरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंची तर सुनेत्रा पवारांना शिवसेना नेते विजयबापू शिवतारे, कुलदीप कोंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची मदत होणार आहे.
पुरंदरमध्ये सुप्रिया सुळेंना काँग्रेस आमदार संजय जगताप यांची रसद मिळणार आहे. तर सुनेत्रा पवारांसाठी विजयबापू शिवतारे आणि माजी आमदार दादा जाधवराव एकत्र आले आहेत. दौंडमधील पारंपारिक विरोधक असलेले भाजर आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेशआप्पा थोरात हे दोघेही महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासाठी हा काहीसा सोपा मतदारसंघ आहे. तिथे शरद पवार यांच्याकडे मोठा चेहरा नाही. पण जवळपास 35 वर्ष नगराध्यक्ष पद भुषविलेल्या प्रेमसुख कटारिया यांच्यासारख्या छोट्या पॉकेट्सना पवारांनी सोबत घेतलं आहे. जोडीला पवार आणि सुळेंनी आपले जुने नेटवर्कही अॅक्टिव्ह केले आहे. त्यामुळे इथेही सामना काहीसा बरोबरीतच सुटण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अजितदादा आणि सुप्रिया सुळे या दोघांनाही विजयासाठी इंदापूर आणि खडकवासला हे दोन मतदारसंघ महत्वाचे ठरतात.
इंदापूरमध्ये सध्या पारंपारिक विरोधक असलेले राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची सुनेत्राताईंना मोठी मदत होणार आहे. इथेही शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडे मोठा चेहरा नाही. त्याचा फटका सुप्रिया सुळेंना बसण्याची शक्यता आहे. पवारांनी काही दिवसांपूर्वी इथे भव्य सभा घेतली. कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. शक्तिप्रदर्शन झालं. पण व्यासपीठावर स्थानिक पातळीवरचा एकही मोठा चेहरा नव्हता. परिणामी सुप्रिया सुळेंसाठी कोण मत मागणार आणि कोणाच्या तोंडाकडे बघून इंदापूरकर मत देणार हा प्रश्न उतरतो.
पुणे शहराच्या लगत असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाने लोकसभा असो की विधानसभा निवडणूक. आपलं मताधिक्य नेहमीच भाजपाच्या पारड्यात टाकलं आहे. 2009 च्या विधानसभेला इथून मनसेचे रमेश वांजळे निवडून आले होते. तर राष्ट्रवादीच्या विकास दांगट यांना 56 हजार मते मिळाली होती. 2011 मध्ये रमेश वांजळेंच्या निधानानंतर इथे पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यावेळी अजितदादांनी हर्षदा वांजळेंना राष्ट्रवादीत घेतलं आणि तिकीट दिलं. त्यावेळी अजितदादांनी अनेकांची नाराजी ओढावून घेतली आणि तिथेच भाजपने या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली. धनकवडीचे नगरसेवक असलेल्या तापकीर यांना 59 हजार 634 आणि वांजळे यांना 56 हजार मते मिळाली. तापकीर यांनी तीन हजार 625 मतांनी बाजी मारली. तिथपासून हा मतदारसंघ भाजपकडे गेला तो गेलाच.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या महादेव जानकरांना 98 हजार 700 मते मिळाली. तर सुळेंना 70 हजार 600. महादेव जानकर यांचा पक्ष आणि चिन्ह या भागात नवीन. शिवाय जानकरांचा चेहराही काहीसा ग्रामीण बाज असलेला. पण या शहरी भागाने भाजपचा उमेदवार समजूनच जानकरांना लीड दिलं. त्यानंतरच्या विधानसभेला भीमराव तापकीर यांना एक लाख अकरा हजार आणि राष्ट्रवादीच्या दिलीप बराटेंना 48 हजार 500 मते मिळाली. भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवूनही भाजपने स्वबळावर 62 हजार 500 मतांचं घसघशीत लीड मिळवलं होतं.
2019 मध्ये तर सुप्रिया सुळेंना इथून 86 हजार 993 आणि भाजपच्या कांचन कुल यांना एक लाख 52 हजार 487 मतं मिळाली. कांचन कुल मूळच्या दौंडमधील. पण त्यांना तिथून मिळालेलं लीड होतं अवघं सात हजार. तर दौंडपासून 100 किलोमीटरवरील खडकवासल्यातून लीड होतं तब्बल 65 हजार 494 मतांचं. 2019 च्या विधानसभेला इथून तापकीर यांना एक लाख वीस हजार आणि राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंना एक लाख 17 हजार मते. तापकीर यांनी सलग तिसऱ्यांचा बाजी मारली. 2017 मध्ये या भागाचा महापालिकेत समावेश झाला त्यावेळीही इथून भाजपचे मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले होते.
सुप्रिया सुळेंची वर्षभरापासून तयारी :
आजच्या घडीला तब्बल चार लाख मतदान असून या मतदारसंघातलं मिळणार लीड उमेदवाराच्या विजयासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. खडकवासला मतदारसंघातून जो निर्णायक आघाडी घेईल, त्यालाच बारामतीचा गड सर करणे सोपे जाणार असल्याचे बोलले जात आहे. हीच गरज ओळखून सुप्रिया सुळे मागच्या वर्षभरापासून मतदारसंघात फिरत आहेत. यांच्या या भागामध्ये प्रचाराच्या दोन-तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यांना इथले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सचिन दोडके यांचीही साथ मिळत आहे. सुप्रिया सुळेंचं 2019 मध्ये 65 हजारांनी पिछाडीवर होत्या. पण तिथेचं दोडकेंनी भाजपला विजयसाठी घाम फोडत तापकींचा विजय अवघड केला होता. दोडकेंचा अवघ्या साडे तीन हजार मतांनी पराभव झाला होता. आताही त्यांनीच सुळेंसाठी डमी अर्जही भरला होता. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांचीही इथूनच बऱ्यापैकी ताकद आहे. 2014 मध्ये शिवसेनेला 24 हजार मते मिळाली होती. तर काँग्रेसला आठ हजार मते मिळाली होती. याचीही सुळेंना मदत होणार आहे.
त्यामुळेच अजितदादांनी लावली आहे फिल्डिंग :
या सगळ्याच्या तुलनेच महायुती कुठेतरी मागे पडल्याचे पाहायला मिळत आहे. ही तफावत भरुन काढण्यासाठी अजितदादांनी कंबर कसली आहे. महायुतीचे खडकवासल्यातील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन रविवारी झाले. त्यावेळी अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या. खडकवासला परिसरात एक हजार तीनशेच्या आसपास गृहसंकुले आहेत. यातील काही सोसायट्यांमध्ये पाच-पाच हजारांवर सदनिका आहेत. त्यादृष्टीने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचे नियोजन आणि आखणी करावी. रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न अशा सुटणाऱ्या समस्या या भागात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून या समस्या तातडीने मार्गी लावल्या जातील. त्यामुळे प्रचाराला जाताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तसा ‘शब्द’ नागरिकांना द्यावा.
घड्याळ या चिन्हाला मतदान म्हणजे महायुतीला मतदान हे मतदारांपर्यंत पोहोचवून सोसायट्यांतील मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी. महायुतीचे जिल्ह्यात चार उमेदवार आहेत. मात्र पहिली निवडणूक बारामतीसाठी होणार आहे. त्यामुळे प्रचारातही खडकवासल्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बारामती लोकसभा निवडणुकीलाच प्राधान्य द्यावे. प्रचाराचे सातत्य टिकविण्यासाठी एक ते सात मे हा कालावधी केवळ बारामतीसाठी राखीव ठेवावा. त्यानंतर पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचे नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
याशिवाय पार्थ पवार हेही नऱ्हे, वारजे, कोथरूड,कोंढवे -धावडे, कर्वेनगर, धायरी, उत्तम नगर, सिंहगड रस्त्याचा काही भाग, वडगाव, नांदेड सिटी या भागात फिरत आहेत. पार्थ यांच्यावर या भागातील राष्ट्रवादी आणि भाजपच्या माजी नगरसेवकांना सोबत घेऊन प्रचाराची जबाबदारी देण्यात आली. सध्याच्या घडीला रूपाली चाकणकर, विकास दांगट, हर्षदा वांजळे, दिलीप बराटे असे नेते अजितदादांसोबत आहेत. याशिवाय 2014 मध्ये मनसेने इथे 34 हजार मते मिळवली होती. त्यातील किमान 20 हजार मते तरी सुनेत्रा पवारांच्या बाजूने वळविण्यासाठी अजितदादा कामाला लागले आहेत. एकूणच काय तर कागदावर खडकवासला सुनेत्रा पवारांसाठी सेफ असला तरीही प्रत्यक्ष मतदानातही खडकवासला सेफ व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, अजितदादा आणि पार्थ पवार कामाला लागले आहेत.