Download App

श्रीकांत शिंदेंची उमेदवारी फडणवीसांनी का जाहीर केली? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

अखेर नाही, होय म्हणत कल्याणमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. त्यामुळे ‘श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून (Kalyan Lok Sabha) लढणार की ठाण्यातून लढणार, कल्याणमधून भाजपचा उमेदवार असणार’ या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पण ही उमेदवारी ना शिवसेनेने (Shivsena) जाहीर केली, ना शिवसेनेच्या कोणत्या प्रमुख नेत्याने जाहीर केली ना राज्याचे मुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे यांचे वडील असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर केली आहे ती भाजपचे राज्यातील प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी. ती देखील अत्यंत तातडीने आणि थेट नागपूरमधून. (candidature of Shiv Sena MP Shrikant Shinde from Kalyan has been announced.)

शनिवारी (सहा एप्रिल) सकाळी फडणवीस नागपूरमध्ये भाजप स्थापना दिवसाच्या कार्यक्रमला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना कल्याणविषयी एक प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना थेट श्रीकांत शिंदे यांची उमेदवारीच घोषित करुन टाकली. शिवसेनेच्या नेत्यांनी देखील कोणतेही आढेवेढे न घेता लागलीच या घोषणेला दुजोरा दिला. मात्र कल्याणची जागा शिवसेनेकडे आहे, श्रीकांत शिंदे यांचे वडील शिवसेनेचे मुख्य नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. असे असतानाही त्यांच्या उमेदवारीची घोषणा भाजपकडून झाल्याने अनेक सवाल विचारले जात आहेत. फडणवीस यांनी नेमके असे का केले? श्रीकांत शिंदेंची उमेदवारी भाजपने घोषित करण्याची वेळ का आली? तेच आपण या व्हिडीओमध्ये पाहुयात..

देवेंद्र फडणवीसांनी श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इथे असलेला भाजप विरुद्ध शिवसेना वाद.

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. अनेक वर्षांपासून आनंद दिघे यांनी हजारो तरुण शिवसैनिकांना तयार करुन ठाण्यात शिवसेना रुजवली, वाढवली. मात्र गत काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात भाजपचीही ताकद वाढत आहे. अशात 2014 पासून ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप या दोघांमध्येही विस्तारवादाच्या भूमिकेतून खटके पडायला सुरुवात झाली. 2014 मध्ये कल्याणमधून श्रीकांत शिंदे खासदार झाले तर फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री झाले. शिंदे पिता-पुत्राच्या जोडीने  सत्तेच्या माध्यमातून ठाण्यात आपले वर्चस्व वाढवायला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याने भाजपही आपले आक्रमक रुप दाखवू लागले. यातून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते दुखावले जाऊ लागले.

Supriya Sule : ‘बडे लोग बडी बातें’; हेलिकॉप्टरच्या फेऱ्यांवरुन हसन मुश्रीफांवर सुळेंचा हल्लाबोल

या संघर्षाचा पहिला जाहीर अनुभव आला तो आठ वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीत. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे प्रचार सभा घेत होते. त्यावेळी अचानक भाषण संपताना शिंदेंनी मंत्रीपदासह ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सरकारी यंत्रणेचा घरगड्यासारखा वापर होतो आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देणे सुरु आहे. कार्यकर्त्यांना तडीपार केले जात आहे. शिवसैनिकांना खोट्या प्रकरणात गुंतवले जात आहे, असे आरोप करत शिंदेंनी राजीनामा दिला. अर्थात ठाकरेंनी तो नाकारला. यावर फडणवीस यांनीच शिंदेंवर नाटक कंपनीची टीका केली होती. त्यावेळी पहिल्यांदाच शिवसेना भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.

भाजपने केलेली मतदारसंघाची मागणी :

ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ आणि तीन लोकसभा मतदारसंघ येतात. यातील ठाणे आणि कल्याण हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आणि भिवंडी भाजपकडे असे समीकरण आहे. पण 2019 मध्ये ठाणे जिल्ह्यातून भाजपचे नऊ, शिवसेनेचे पाच, राष्ट्रवादीचे दोन, मनसेचा एक आणि समाजवादी पक्षाचा एक असे आमदार निवडून आले. त्यामुळे यंदा आपली जिल्ह्यात शिवसेनेपेक्षा जास्त ताकद आहे, नवी मुंबईवरही आपलाच वरचष्मा आहे, असे दावे करत भाजपने ठाणे किंवा कल्याण या दोन्हीपैकी एका मतदारसंघ आपल्याला मिळाला अशी आग्रही मागणी केली.

इथेच भाजप विरुद्ध शिवसेना वादाचा आणखी एक नवा अंक सुरु झाला. ठाणे लोकसभा मतदारसंघ 1996 मध्ये आनंद दिघे यांनी भाजपकडून शिवसेनेकडे खेचून आणला होता. शिवाय सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही ठाण्यातूनच येतात. मुख्यमंत्र्यांच्या राजकारणाचे मूळच ठाणे जिल्हा आहे. तर कल्याण लोकसभा मतदारसंघ हा श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे दोन्ही पैकी कोणत्याही एक मतदारसंघाची मागणी करत भाजपने एकनाथ शिंदे यांच्या मुळावरच घाव घातल्याची चर्चा होती. हे ओळखून  शिंदे यांनीही भाजपच्या या मागणीला तीव्र विरोध करायला सुरुवात केली.

संजय शिरसाटांनी घेतली राज ठाकरेंची भेट, ‘ते महायुतीत आल्यास रेड कार्पेटवर स्वागत करू…’

पण भाजपने आपली मागणी सोडली नाही. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदेंना असलेला विरोध आणि ठाण्याचे शिवसेनेसाठी असलेले महत्व हे लक्षात घेता श्रीकांत शिंदे ठाण्यातून लोकसभा लढवतील अशी चर्चा होती. मध्यंतरी भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता. तेव्हापासून तर कल्याण भाजपकडेच जाणार या चर्चांना बळ मिळाले.

त्यानंतर शिवसेनेच्या पहिल्या यादीतही श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर झाले नव्हते. स्वतःच्या मुलाचीच उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर करु न शकल्याने मुख्यमंत्री शिंदेंनाही विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र शिंदे यांनी या दोन्ही मतदारसंघासाठी भाजपसमोर आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे कल्याण तरी ते स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. आता ठाण्याचे काय होते ते येण्याऱ्या काही दिवसातच लक्षात येईल. पण भाजपकडून खेचून आणलेला ठाणे मतदारसंघ दिघे यांच्या शिष्याने त्यांना परत केला हे शिवसैनिकांच्याही सहज पचनी पडणार नाही हे शिंदे यांनी ओळखले आहे.

वर्चस्ववाद, लोकसभा मतदारसंघांवरील दावा या गोष्टींना जोड मिळाली ती श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात भाजपने केलेल्या ठरावांची. 

श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीला विरोध म्हणून वर्षभरापूर्वी डोंबिवलीचे आमदार आणि राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोरच कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे कोणतेही काम करणार नाही, अशी भूमिका भाजपच्या स्थानिक कार्यकर्यांनी घेतली होती. तसा ठरावच मंजूर केला होता. रवींद्र चव्हाण यांनीही कार्यकर्त्यांच्या मताचा सन्मान राखण्याची भूमिका घेतली. यावरुन काही जण युतीत मिठाचा खडा टाकत आहेत, असा आरोप करत श्रीकांत शिंदेंनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर हा वाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत गेला होता.

शुक्रवारी रात्री देखील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजपच्या काही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी असाच एक ठराव मंजूर केला. यात श्रीकांत शिंदे यांना आपण मदत करायची नाही, असे ठरवण्यात आले. ही बातमी बाहेर आली. इथेच देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्याचे मुख्य कारण ठरले. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पोहचल्यास महायुतीमधील बेबनाव समोर आला असता. भाजपबद्दल राज्यात वेगळा संदेश गेला असता. तो सध्याच्या परिस्थितीत तरी परवडणारा नाही, हे फडणवीसांनी ओळखले होते.

त्यामुळेच श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करुन एक प्रकारे फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये कोणताही बेबनाव नाही, कोणताही वाद नाही, त्यांच्या जागेवर आपला दावाही नाही, असा मेसेज फडणवीस यांनी महाराष्ट्रात देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते आहे. याशिवाय आतापर्यंत आपण ज्यांच्या उमेदवारीला, कार्यपद्धतीला. एकाधिकारशाहीला विरोध करत होतो, त्यांची उमेदवारी आपल्याच नेत्याने जाहीर केल्याने भाजपच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यातही एक सूचक संदेश गेला आहे. त्यामुळे तूर्तास तरी भाजपला श्रीकांत शिंदे यांना होणारा विरोध नाईलाजास्तव थांबवावा लागणार आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्याच विजयासाठी झटावे लागणार आहे, हे नक्की.

follow us

वेब स्टोरीज