Ranjitsinh Naik Nimbalkar on Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरू आहे. आज अकलूजमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत बोलतांना रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि धैर्यशील मोहिते पाटलांवर जोरदार टीका केली.
ज्यांनी पाणी अडवलं त्यांना निवडून देणार का? फडणवीसांचा मोहितेंवर घणाघात
सभेला संबोधित करतांना रणजितसिंह निबाळकर म्हणाले, पाच वर्षात सातत्याने ज्या माणसाने रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहित पाटील या दोन्ही भावांना प्रचंड मदत केली. अडचणीतला कारखाना पुन्हा रुळावर आणून दिला. दोन दोन कारखान्याला मदत केली. विधान परिषदेचं सदस्यपद देऊ केलं. आणि त्याच माणसाच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. कारण गद्दारी त्यांच्या नसानसात भरलेली आहे, अशी टीका निंबाळकरांनी केली. गद्दारीकरूनही आज तेच महाशय अकलूजच्या बाहेर गुलाबाचा दस्ता घेऊन थांबले होते. पण फडणवीस यांनी तो गुलाबाचा दस्ता स्वीकारला नाही. ते थेट सभेकडे आले. आता गद्दारांना माफी नाही, असा इशाराही निंबाळकरांनी दिला.
400 पार सोडा 200 च्या पुढेही जाणार नाहीत; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्ला
मोहिते पाटलांनी चाळीस हजार लोकांचे पैसे बुडवले. सुमित्रा, विजयशुगर, रत्नप्रभा बॅंक, आळेगाव कारखाना बंद पडला. लोकांकडून पैसा गोळा केला. एक एक हजार कोटी रुपये जमा केले. अनेकांचे संसार उद्धवस्त केले. लोकांच्या बुडवलेल्या एक एक रुपयाचा हिशोब घेणार आहे. हा रणजितसिंह नाईक कोणाच्या बापाला भीत नाही. यांचा बाप बारामतीत बसला, त्या बापालाही भीत नाही. त्यांच्या बापाच्या घशात हात घालून पाणी परत मिळशिरसला उपलब्ध करून दिलं. आताही जे ताकद लावायची ती लावा, चार तारखेला रिझल्ट काय होईल ते कळेल, असंही रणजित निंबाळकर यांनी म्हटलं.
निंबाळकर म्हणाले, शरद पवारांनी जातीभेद निर्माण केला. मराठा समाजाला सांगायचे तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. माळी समाजालाही तेच सांगायचे. धनगर समाजाचे नेते घरी बोलावून सांगायचे की, तुम्ही आरक्षणाचा लढा उभारा. निवडणूका आल्या की, जाती जातीत विष कालवायंच काम पवारांनी केलं, अशी टीकाही रणजितसिंह निंबाळकरांनी केली.
पुढं ते म्हणाले, अण्णासाहेब पाटील शरद पवार यांच्याकडे गेले. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास मी आत्महत्या करेन, असे ते म्हणाले. त्यांनी आत्महत्या केली, पण आरक्षण मिळाले नाही. शरद पवार गद्दार आहेत, उद्धव ठाकरेही तसेच आहेत, अशी टीका रणजित निंबाळकर यांनी केली आहे.