तटकरेंनंतर अजितदादांकडून आणखी एका उमेदवाराची घोषणा; बालेकिल्ल्यात उतरवला खास शिलेदार
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर आणखी एका बालेकिल्यात अजितदादांकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. लक्षद्वीपच्या जागेवर युसूफ टीपी (Yusuf TP) यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्राबाहेर लोकसभेची (Lok Sabha Election) ही एकमेव जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे. प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव यांनी युसूफ टीपी यांच्या उमेदवारीबाबत माहिती दिली. (NCP has announced the candidature of Yusuf TP on Lakshadweep seat.)
यापूर्वी 2019 च्या लोकसभेला राष्ट्रवादीच्या वतीने ही जागा मोहम्मद फैजल यांनी जिंकली होती. मात्र, राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर फैजल यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. तर भाजपची इथे ताकद नसल्याने ही जागा अजित पवार यांच्यासाठी सोडली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पक्षाने उमेदवाराची घोषणा केली आहे. त्यामुळे इथली लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अशी होताना दिसणार आहे.
https://twitter.com/brijmohan/status/1772574832703476032
युसूफ टीपी यांच्या उमेदवारीबाबत बोलताना राष्ट्रीय सरचिटणीस आणि लक्षद्वीपचे प्रभारी मोहम्मद कुट्टी म्हणाले की, युसूफ टीपी हे लक्षद्वीपमधील मुस्लिम विद्वान म्हणून अतिशय आदरणीय नाव आहे. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सामाजिक कार्यकर्त्याची असून मशिदीचे इमाम म्हणून मुस्लिम समाजात त्यांना खूप मानाचे स्थान आहे. त्यांची सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे.
मित्राला पाठिंबा देण्याचे शहाणपण :
मुस्लीमबहुल लक्षद्वीपमध्ये भाजपची फारशी ताकद नाही. गत निवडणुकीत इथे भाजप उमेदवाराला 245, 187 अशी मते मिळाली आहेत. तर त्याचवेळी राष्ट्रवादीने इथे गत दोन्ही निवडणुकीत विजय मिळविला आहे. त्यामुळेच भाजपने आपला उमेदवार उभा करण्याचे टाळले असून मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला पाठिंबा देत ही जागा त्यांच्या पक्षाला दिली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीत किमान आठ ते नऊ जागांचा आग्रह धरला आहे. पण भाजप पाचपेक्षा जास्त जागा सोडण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर भाजपने राज्याबाहेर एक जागा देत अजित पवार यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.