अखेर राज ठाकरे यांच्या मनसेने (MNS) अधिकृतपणे आपले इंजिन महायुतीच्या डब्यांना जोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा असे म्हणत राज ठाकरेंनी महायुतीत प्रवेश केला. मागच्या अनेक दिवसांपासून या युतीबाबत भाजप आणि मनसेकडून सकारात्मक चित्र दिसत होते. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिल्लीत जाऊन भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेटही घेतली होती. त्यानंतर गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ही युती प्रत्यक्षात आली आहे. पण अवघा एक आमदार असलेल्या मनसेच्या या जोडणीचा महायुतीला कितीपत फायदा होणार? यामुळे खरंच मतविभागणी रोखली जाईल का? राज ठाकरे आणि मनसेला मिळणारी सगळी मते महायुतीच्या उमेदवारांना जातील का? हे बघणे महत्वाचे आहे. (Raj Thackeray joins Grand Alliance saying unconditional support for Prime Minister Narendra Modi.)
2006 साली राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. मराठी भाषा आणि परप्रांतियांचा मुद्दा अजेंड्यावर घेत मनसेने राज्यभर आक्रमक आंदोलने केली. त्या जोरावर मनसेचा एक झंझावत तयार झाला. 2007 साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने अकरा उमेदवार उभे केले होते. यात त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नव्हता. पण तेव्हा शिवसेनेला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. मुंबईतील सर्व सहा जागांवर काँग्रेस आघाडीचे उमेदवार निवडून आले होते. जवळपास सर्व उमेदवारांनी एक लाखापर्यंत मते मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसला 17, राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपचे नऊ आणि शिवसेनेचे 11 उमेदवार विजयी होऊ शकले होते.
लोकसभेनंतर लगेचच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 143 जागांवर उमेदवार दिले होते. त्यातील 13 उमेदवार आमदार झाले होते. तर तेरा जागांवर क्रमांक दोनची मते मिळाली होती. शिवाय एकोणतीस जागांवर मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यावेळी मनसेला राज्यतून तब्बल 25 लाख 85 हजार मते मिळाली होती. त्यापाठोपाठ झालेल्या पुणे, नाशिक, मुंबई या महापालिका निवडणुकीतही मनसेने दमदार कामगिरी केली. मुंबईत 28, ठाण्यात सात, पुण्यात 29, पिंपरी-चिंचवडमध्ये चार आणि नाशिक महानगरपालिकेत 40 नगरसेवक निवडून आले होते.
थोडक्यात 2012-13 पर्यंत राज ठाकरे आणि मनसेची लोकप्रियता शिखरावर होती. पण त्यानंतर मनसेचा आलेख उतरत गेला. याला कारण ठरलं ते राज ठाकरेंनी पंतप्रधान पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेला पाठिंबा. त्यांनी एक प्रकारे मोदींना नेता म्हणूनच मान्यता दिली. पण त्याचवेळी ते शिवसेनेलाही विरोध करत होते. भाजपला पाठिंबा पण शिवसेनेला विरोध अशी विचित्र सांगड घालून राज ठाकरेंनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. त्यांनी शिवसेनेच्या 10 उमेदवारांविरोधात आपले उमेदवार दिले. पण त्यांना केवळ 1.5 टक्के मते मिळू शकली. 2009 च्या विधानसभेला 25 लाख मते आणि 2014 च्या लोकसभेला सात लाख मते अशी अवस्था राज ठाकरेंची झाली.
त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यभरातील 219 जागांवर उमेदवार उभे केले. पण त्या निवडणुकीत मनसेला अत्यंत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या मताच्या टक्केवारीतही कमालीची घट झाली. 219 पैकी केवळ एका जागेवर मनसेला यश मिळविता आले. तर 25 लाखांवरुन मतदान थेट 16 लाख 65 हजारांपर्यंत खाली आले. याशिवाय त्यानंतर झालेल्या मुंबई, पुणे, नाशिक या महापालिका निवडणुकीतही मनसेला यश मिळाले नाही. मुंबईत अवघे सात नगरसेवक निवडून आले. नाशिकची महापालिकाही मनसेच्या हातून निसटली.
2019 मध्ये राज ठाकरे यांनी लोकसभेच्या मैदानातून माघार घेतली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहंना विरोध करण्याची भूमिका घेत भाजप-शिवसेनेच्या विरोधात प्रचार सुरु केला. आपला एकही उमेदवार नसताना त्यांनी केवळ मोदी-शाहंच्याविरोधात प्रचारसभांना सुरुवात केली. लाव रे तो व्हिडीओ म्हणत वातावरण ढवळून काढू लागले. त्यांची ही भूमिका आघाडीला पुरक होती. पण आघाडीला त्यांच्या भूमिकेचा फारसा उपयोग झाला नाही, अशी प्रतिक्रिया स्वतः आघाडीच्या नेत्यांनी दिली होती.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 101 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील एकाच जागेवर विजय मिळविता आला. तर एकूण नऊ मतदारसंघात मनसेला दुसऱ्या क्रमांकावर मते मिळाली. त्यावर्षीही मनसेच्या मतांमध्ये लक्षणीय घट झाली. 2009 च्या तुलनेत मनसेच्या मतांमध्ये निम्मी घट झाली. मनसेला अवघी 12 लाख मते मिळाली. एकूण मतांच्या टक्केवारीत मनसेला केवळ दोन टक्के मते मिळविता आली होती. 2009 मध्ये मनसेला मुंबईत 24 टक्के मते मिळाली होती. 2019 मध्ये हा आकडाही निम्म्याने घसरला. मनसेच्या अनेक माजी आमदारांनीही पक्षाला राम राम केला. प्रवीण दरेकर, राम कदम, रमेश पाटील आणि वसंत गीते यांनी मनसेसोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
आता पाच वर्षानंतर मनसेच्या मतांच्या आकड्यात घट झाली की वाढ झाली हे येणारा काळच सांगेल. पण 2019 मधील 12 लाख मतांसाठी भाजपने मनसेला आपल्यासोबत घेतल्याचे दिसून येते. मनसेची ही 12 लाख मतांची ताकद प्रामुख्याने मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील शहरी पट्ट्यात आहे. 2009 मध्येही मनसेच्या 13 पैकी आमदारांपैकी मुंबईतून सहा, ठाण्यातून दोन, नाशिकमधून तीन, पुण्यातून एक आणि छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडमधून एक उमेदवार विजयी होऊ शकला होता. त्यामुळे आताही मुंबईतील सहा, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, नाशिक, मावळ या मतदारसंघांमध्ये भाजपला आणि शिवसेनेला मनसेच्या या मतांचा उपयोग होऊ शकतो.
राजकीय विश्लेषकांच्या मते, मनसेचा उमेदवार रिंगणात नसल्यास त्यांची पारंपरिक मते ही मराठी, हिंदुत्व आणि ठाकरे या तीन मुद्द्यांमुळे शिवसेनेकडे हस्तांतरित होतात. यापूर्वीच्या निवडणुकीत याचा अनुभव आला आहे. 2019 च्या लेकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले नव्हते. तेव्हा मनसेची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीला अनुकूल होती. तेव्हा लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि शिवसेनेवर टीका करीत होते. पण तेव्हाच्या आकडेवारीनुसार मनसेची पारंपरिक मते शिवसेना उमेदवारांच्या पारड्यात पडली होती. त्यामुळेच राज ठाकरे यांचा आम्हाला काहीच फायदा झाला नव्हता, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आताही मुंबईतील राज ठाकरे यांची चार ते पाच लाख मते शिवसेना आणि भाजप उमेदवारांच्या बाजूने वळवण्याचे महायुतीचे गणित असल्याचे बोलले जाते.