सांगली : ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटातील वातावरण तापले आहे. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) सांगलीच्या जागेसाठी आग्रही असून, विशाल पाटलांसाठी (Vishal Patil) विश्वजीत कदम शड्डू ठोकत मैदानात उतरले आहेत. ठाकरे सांगलीत दिलेला उमेदवार मागे घेण्यास तयार नाही त्यामुळे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील टोकाचा निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता अनेकांना होती. मात्र, सांगली काबीज करण्यासाठी विश्वजीत कदमांनी डोक्यावर बर्फ आणि तोंडी साखर ठेवत ICE & Sugar अशी खास योजना आखल्याचे दिसून आले आहे. (Vishwajeet Kadam & Vishal Patil Press )
कमळामुळे नव्हे तर, धनुष्यबाणामुळे लागला राज ठाकरेंच्या ‘इंजिन’ला ब्रेक!
सांगलीत आज (दि.9) विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यात विश्वजीत यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) आम्ही यापूर्वीही प्रयत्न केलेत आणि इथून पुढेही करणार असल्याचे अगदी शांतपणे सांगितले. सांगलीची जागा काँग्रेसची (Congress) आहे. इथल्या कार्यकर्त्यांचीही तीच भावना आहे. त्यामुळे सांगलीबाबत पक्षश्रेष्ठींनी पुनर्विचार करावा, अशी मागणी यावेळी कदम यांनी केली. एकीकडे विश्वजीत त्यांच्या मनातल्या भावना बोलून दाखवत होते तर, ज्या विशाल पाटलांसाठी विश्वजीत यांनी शड्डू ठोकला आहे त्यांच्या बाजूला एक शब्दही न बोलता विशाल पाटील अगदी खंबीरपणे साथ देत असल्याचे पाहण्यास मिळाले.
वाद न वाढवता पवार, ठाकरेंना दिला मान
सांगलीच्या जागेवरून एकीकडे राऊत दररोज आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. राऊतांच्या भूमिकेला विश्वजीत कदम रोखठोक प्रत्त्युत्तर देतील अशी आशा होती. पण तसे झालेच नाही. उलट विश्वजीत कदमांनी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे नाव घेत त्यांना आदरणीय असे संबोधले. एवढेच नव्हे तर, विश्वजीत यांनी उद्धव ठाकरेंचे तोंडभरून कौतुक केले. त्यामुळे सांगलीसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर ज्या आक्रमक भूमिकेत विश्वजीत दिसून आले होते. ते बघता आज ते टोकाचा निर्णय जाहीर करतील असे वाटत होते. पण, त्यांनी आक्रमक न होता पवार आणि ठाकरेंसाठी मानाचे शब्द उच्चारत वाद विकोपाला नेण्याऐवजी तो गोड बोलून आणि शांत डोक्याने सोडवण्याकडे भर दिला आहे. सांगली मिळवण्याासाठीची विश्वजीत यांची ICE & Sugar पॉलिसी ठाकरे मोठ्या मनाने एक पाऊल मागे घेत नरमाईची भूमिका घेण्यास भाग पाडते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शरद पवार अंतिम क्षणी निर्णय घेऊ शकत नाही; घडलेल्या घटनेचं उदाहरण देत पटेलांनी पटवून दिलं
काय म्हणाले विश्वजीत कदम
स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. अगदी आणीबाणीतही इथून काँग्रेसचा विजय झाला होता. त्यामुले जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस लढवण्यासाठी सक्षम आहे. पण याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी या जागेवर दावा केला. त्यांनी चंद्रहार पाटील यांची अचानक उमेदवारी देखील जाहीर केली. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेबाबत एकतर्फी निर्णय घेण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. पण आम्ही अगदी दिल्लीपासून राज्यात प्रयत्न केले आहेत. यानंतरही या जागेसाठी आम्ही प्रयत्न करत राहु. पक्षश्रेष्ठींनी या जागेबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
सांगलीचा वाद नेमका काय ?
महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि मुंबईतील काही जागा वाटपावरून अंतर्गत मतभेद झाले होते. यात सांगलीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये प्रचंड ताणाताणी झाली. ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची परस्पर घोषणा केली. त्यामुळे आमदार विश्वजित कदम, इच्छुक उमेदवार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी थेट दिल्ली गाठून सांगलीची उद्धव ठाकरे यांची मे रोजी सभा जागा सोडू नये, अशी मागणी केंद्रीय नेत्यांकडे केली होती. विश्वजित कदम यांनी मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची आणि नागपूरमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांचीही भेट घेतली होती.
भाजप-मनसे युती : एकनाथ शिंदे अन् अजितदादांसाठी धोक्याची घंटा
मात्र हा चेंडू सोनिया गांधी यांच्या कोर्टात असल्याचे सांगण्यात येत होते. ठाकरेंकडून सुरुवातीपासूनच याबाबत प्रदेश नेत्यांशी कोणतीही चर्चा न करता राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा केली जात होती. अशात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती. पण सांगलीच्या विषयावर प्रदेश नेत्यांशी कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही राष्ट्रीय नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे, असा निरोप ठाकरेंनी दिला आणि भेट नाकारली. त्यानंतर काल (9 एप्रिल) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पार पडलेल्या एकत्रित पत्रकार परिषदेतही सांगलीची जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षच लढणार असल्याचे तिन्ही पक्षांनी घोषित केले. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून तयारी करत असलेले विशाल पाटील नाराज झाले आहेत.