Download App

Sangli News : सांगलीच्या पैलवानाला ‘मातोश्रीचा’ आशीर्वाद मिळवून देणारा वस्ताद ‘राष्ट्रवादीचा’?

How Chandrahar Patil Gets Loksabha Ticket From Sangli : महिनाभर सुरु असलेला चर्चेचा काथ्याकूट, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडूनही अद्याप सांगली मतदारसंघाचा प्रश्न सुटलेला नाही. याला कारण ठरले आहे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली उमेदवारी. चंद्रहार पाटील यांचे नाव तसे महाराष्ट्राला नवीन नाही. कुस्ती क्षेत्राला तर अजिबात नाही. सलग दोनवेळा महाराष्ट्र केसरीची स्पर्धा जिंकत मानाची गदा पटकवलेला पैलवान म्हणून चंद्रहार यांना ओळखले जाते. पण अलिकडेच त्यांचे हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरही चर्चेत आले आहे.

साताऱ्यात मोठा ट्विस्ट! खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार

पाटील यांनी राज्याच्या राजकारणात घडवलेली उलथापालथ, काँग्रेससारख्या मातब्बर पक्षाला, वसंतदादा पाटील यांच्यासारख्या दिग्गज घराण्याला चितपट करुन मिळवलेली सांगलीची उमेदवारी आणि महाविकास आघाडीत लावून दिलेली कुस्ती सध्या महाराष्ट्र पाहत आहे. पण त्यांनी ही किमया साधली कशी हा प्रश्न अनेकांना अनुत्तरित आहे. कारण त्यांचे राजकीय वजन हे फक्त एका जिल्हा परिषदेच्या गटापुरते मर्यादित होते. पाटील यांना हीच किमया साधण्यासाठी एका राष्ट्रवादीच्या वस्तादाने मदत केल्याची चर्चा सध्या सांगली जिल्ह्यात सुरु आहे. नेमका कोण आहे हा वस्ताद आणि चंद्रहार पाटील यांनी कशी किमया साधली, पाहुया या व्हिडीओमधून.

सांगलीमध्ये तसा काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष पारंपारिक चालत आलेला आहे. दादा घराण्याच्या दुसऱ्या पिढीच्या अस्तानंतर सांगलीची सुत्रे जयंत पाटील यांनी हातात घेतली. दादा घराण्याच्या ताब्यात असलेली जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा बँक, बाजार समित्या या संस्था जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या छत्राखाली आणल्या. थोडक्यात काँग्रेसची ताकद कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु झाला. याच कार्यक्रमातून चंद्रहार पाटील यांचा उदय झाला.

Loksabha Election 2024 : मावळात पुन्हा बारणेंना संधी पण धनुष्यबाण पेलणार का?

विट्याजवळच्या भाळवणीतील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चंद्रहार पाटील यांनी हैदराबादमध्ये कुस्तीचे डावपेच शिकले. पुढे महाराष्ट्र केसरीचा दोनवेळा किताब पटकावल्यानंतर तेव्हाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या रामराव पाटील यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाळवणी गटातून पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. ते विजयी झाले. एवढीच काय ती त्यांची ताकद होती. पण दोन वर्षांपासून त्यांनी थेट लोकसभेची तयारी सुरु केली होती. बैलगाडी शर्यत, रक्तदान शिबीर, युवकांचे मेळावे अशा गोष्टींमधून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते.

पण चंद्रहार पाटील हे विशाल पाटील यांना तुल्यबळ उमेदवार होतील याचा कोणीच अंदाज लावला नव्हता. अगदी त्यांना स्वतःलाही नाही. त्यामुळे सुरुवातीला ते वंचित बहुजन आघाडीचे तरी का होईन पण तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. मग महिन्याभरात पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलली. ठाकरेंनी कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिले, हातकणंगलेतून शेट्टींना पाठिंबा, सातारा आणि माढा शरद पवारांकडे, सोलापूर काँग्रेसकडे. आता प्रश्न राहिला होता सांगली मतदारसंघाचा. पश्चिम महाराष्ट्रात एका तरी जागेवर मशाल चिन्ह असावे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सांगलीवर दावा ठोकला.

तब्बल 238 वेळा पराभूत, तरीही लोकसभेसाठी ठोकला शडडू; तामिळनाडूतील उमेदवार कोण?

ठाकरेंची जिल्ह्यातील नगण्य ताकद पाहता सुरुवातीला हा दावा दबावाचा भाग वाटला, त्यामुळे काँग्रेसनेही हालक्यात घेतले. पण हळू हळू ठाकरे सिरीयस वाटायला लागले. त्याचवेळी संजय राऊतही मैदानात उतरुन लढायला लागले. रोज सकाळी माध्यमांमध्ये येऊन सांगलीवरील मांड पक्की करु लागले. नॅरेटिव्ह सेट होऊ लागले. ठाकरेंचे हे राजकारण बघून काँग्रेसचे नेतेही खडबडून जागे झाले, अन् मग मतदारसंघ वाचविण्यासाठी धापवळ सुरु झाली. हीच संधी साधली ती चंद्रहार पाटील यांनी. कुठेही चर्चेत नसणारे चंद्रहार पाटील अचानक चर्चेत येऊ लागले.

जे चंद्रहार पाटील वंचित बहुजन आघाडीचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते त्यांना थेट मातोश्री बंगल्याचे दरवाजे उघडण्यात आले. त्यांचा पक्षप्रवेश झाला अन् ठाकरेंनी त्यांना उमेदवारीही जाहीर केली. इथेच त्यांच्या मागे जिल्ह्यातीलच एखाद्या बड्या नेत्याचा हात असावा अशी चर्चा सुरु झाली. कारण मातोश्रीवर प्रवेश मिळविणे अन् उद्धव ठाकरे यांची भेट घेणे हे तसे जिकीरीचे काम. अनेक आमदार, खासदार ही गोष्ट जाहीरपणे बोलून दाखवतात. पण पाटलांना मातोश्रीचा अगदी सहज आशीर्वाद मिळाला.

Letsupp Special शिवतारेंनी स्वतःच आग लावली…. मग ती विझली कशी? जाणून घ्या इनसाईड स्टोरी!

त्यानंतर आणखी एक घटना सांगलीच्या एका वृत्तपत्रात छापून आली होती. गत गुरुवारी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक सुरु होती. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ही बैठक अर्ध्यावर सोडून मिरजमधील संवाद यात्रेसाठी निघून गेले. तिथे कार्यक्रमस्थळी जाण्यापूर्वी ते सांगलीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचे चार ते पाच समर्थक हॉटेलवर पोहोचले. मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून नेत्यांच्यावतीने भेटायला आल्याचा निरोप उध्दव ठाकरे यांना दिला. यानंतर तासभर खलबते झाली आणि उद्धव ठाकरे यांनी मिरज येथील मेळाव्यात चंद्रहार पाटील यांची थेटपणे उमेदवारीच जाहीर केली. याच सगळ्या घटनाक्रमामुळे चंद्रहार पाटील यांना मातोश्रीचा आशीर्वाद सहजपणे मिळवून देणारा वस्ताद राष्ट्रवादीचा आहे का? अशा चर्चांना आणखी हवा मिळते…

follow us