Letsupp Special : नाही मशाल, फक्त विशाल : उद्धव ठाकरेंसाठी सांगली भूंकपाचे केंद्र
Sangali Loksabha Constituency : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात अपेक्षेप्रमाणे ठाकरेंसोबत असलेल्या पाचही खासदारांना त्यात स्थान मिळाले. निष्ठावंतांना संधी मिळाली. नवीन चेहरेही त्यामुळे शिवसेनेला मिळाले. पण दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या काॅंग्रेसच्या जखमांवर मात्र मीठ चोळण्याचे काम या यादीने केले आहे. ही जखम इतकी तीव्र आहे की महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काॅंग्रेस हे दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले जाणार आहेत. असे कोठे घडेल हे तुमच्या लक्षात आले असेलच. ही जागा म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ. याशिवाय वायव्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने अमोल कीर्तीकर यांना सेनेने उमेदवारी दिली आहे. त्यातून काॅंग्रेसचे नेते संजय निरूपम हे नाराज झाले आहेत. ते काॅंग्रेस सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे सेनेच्या मशालीची धग काॅंग्रेसला दोन मतदारसंघात बसली आहे. निरूपम यांची सोडचिठ्ठी काॅंग्रेससाठी महत्वाची नसेल. पण सांगलीच्या जागेवर काॅंग्रेसचे स्थानिक नेते तडजोडीच्या तयारीत नाहीत.
या सांगली लोकसभा मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिवसेनेने या यादीमार्फत शिक्कामोर्तब केले आहे. उद्धव ठाकरे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर सभेतून घोषित झाली. तेव्हाच काॅंग्रेसला धक्का बसला होता. तरीही काॅंग्रेस नेत्यांनी धीर सोडला नव्हता. या जागेसाठी अजूनही चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. पण शिवसेनेने अधिकृत यादीतही पाटलांचे नाव ठेवल्याने काॅंग्रेससाठी हा धक्का आहे.
सांगलीच्या जागेवर तिढा असताना ही उमेदवारी जाहीर केलीच कशी असा सवाल काँग्रेस नेत्यांनी विचारायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, विक्रम सावंत, काँग्रेसचे सांगली मतदारसंघाचे इच्छुक विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत.
Lok Sabha 2024 : जैन अन् मुस्लिमांना उमेदवारी; वंचित बहुजन आघाडीचा इलेक्शन अजेंडा सेट !
काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असलेल्या आमदार झिशान सिद्दकी यांना या निमित्ताने स्वपक्षावर टीका करण्याची संधी मिळाली. ठाकरे गटाला त्यांनी लक्ष्य केले. “शिवसेनेने सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करणे यावरुन दिसून येते की मित्र पक्ष म्हणून काँग्रेसला ते किती महत्त्व देतात आणि त्यांचा किती आदर करतात? शिवसेनेच्या विरोधात बोलल्याबद्दल माझ्यावर टीका होत आहे पण एक दिवस लोकांना कळेल की ही युती महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचेच नुकसान करते आहे,“ अशा शब्दांत सिद्दीकींनी सुनावले आहे.
सांगलीच्या बाबतीत शिवसेनेचा युक्तिवादही तगडा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरची जागा ही परंपेरने शिवसेनेकडे होती. ही जागा शिवसेनेने कोणतीही खळखळ न करता छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी सोडली. शाहू महाराजांनी आपण काॅग्रेसच्या चिन्हावरच उमेदवारी लढणार असल्याची अट घातली होती. त्यामुळे शिवसेनेचा नाईलाज झाला. शिवसेनेची दुसरी जागा म्हणजे हातकणंगले. हा मतदारसंघ राजू शेट्टी यांना सोडण्याची तयारी महाविकास आघाडीने ठेवली आहे. त्यामुळे येथेही ठाकरे गटाचे मशाल चिन्ह दिसणार नाही. मग पश्चिम महाराष्ट्रात एक तरी जागा मशालीसाठी मिळणे ठाकरे यांना आवश्यक वाटले. त्यामुळे त्यांनी सांगलीची जागा ही काॅंग्रेसकडून हिसकावून घेतली.
हे वरच्या पातळीवरचे राजकारण असले तरी सांगली जिल्ह्यात काॅंग्रेसची मोठी ताकद आहे. या जिल्ह्यात पहिल्यांदाच वसंतदादा पाटील घराणे आणि विश्वजित कदम हे एकत्र आले आहेत. पाटील घराण्याला गेली दहा वर्षे राजकीय घरघर लागली आहे. त्यातून काॅंग्रेसचे मोठे नुकसान झाले. ही चूक आता लक्षात आल्याने या घराण्याला पुन्हा राजकीय संजीवनी देण्याची तयारी काॅंग्रेसने केली होती. त्यातून विशाल पाटील यांची उमेदवारी पक्षाने निश्चित केली होती. पण महाविकास आघाडीच्या जागावाटपात सारेच गणित फिसकटले. काॅंग्रेसच्या तुलनेत या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद नगण्य आहे. तरीही ही जागा सेनेकडे गेल्याने काॅंग्रेस कार्यकर्ते संतप्त होणे स्वाभाविक आहे. त्यातून आता सांगलीत वेगळीच समीकरणे आकारास येऊ शकतात. शिवसेनेची यादी जाहीर झाल्यानंतर विश्वजित कदम यांची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे. ही जागा सोडवून आणण्यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला आहे. तरीही उद्धव ठाकरे गांधी यांचे ऐकतील का हा प्रश्नच आहे. या साऱ्या वादात महाविकास आघाडीचा खेळ बिघडू शकतो, इतका हा वाद टोकाचा आहे.
ठाकरेंसमोर काँग्रेस नतमस्तक, घरचा आहेर देत निरूपम यांनी दिले ‘जय महाराष्ट्र’ करण्याचे संकेत
वेळ पडली तर सांगलीत विशाल पाटील हे अपक्ष उभे राहण्याच्या तयारीत आहेत. तेथील जिल्हा काॅंग्रेस समिती देखील बरखास्त करून सारे नेते हे विशाल पाटलांच्या प्रचारात उतरण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यामुळे पक्षाने कोणावर कारवाई करण्याचाही प्रश्न उपस्थित राहणार नाही. नाही मशाल, फक्त विशाल, अशा घोषणा आता काॅंग्रेस कार्यकर्ते देत आहेत. सांगलीत विशाल पाटील हे अपक्ष उभे राहिले तर महाविकास आघाडीला तडे बसण्याचाही धोका आहे. मग शिवसेनेचे कार्यकर्तेही इतर मतदारसंघात काॅंग्रेस उमेदवारांच्या विरोधात काम करण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळेच सांगलीचा तिढा हा महाविकास आघाडीत ठसठसणारी जखम बनला आहे. त्यावर वेळीच मलमपट्टी करण्याची गरज आहे.