मुंडवा जमिन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला कोर्टात केलं हजर; सुनावणीवेळी आली चक्कर…

आरोपी शीतल तेजवानीला कोर्टात केले हजर; वकिलांकडून जामिनाला कडाडून विरोध; सुनावणीदरम्यान शीतल तेजवानीला आली चक्कर.

  • Written By: Published:
Untitled Design (45)

Mundwa land scam case : राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील मुंढवा येथील तब्बल 40 एकर जमीन खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी शीतल तेजवानीला (Sheetal Tejvani) अटक करण्यात पुणे पोलिसांना (Pune Police) यश आलंय. पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून पोलिसांकडून शीतल तेजवानी हिला 2 वेळा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पोलीस चौकशीत तिच्या भूमिकेबद्दल महत्वाची माहिती मिळाल्यानंतर अखेर तिच्यावर कारवाई करण्यात आली. ही जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar)यांच्या कंपनीसाठी खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण व्यवहारात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा देखील आरोप करण्यात आला होता.

याच प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून शीतल तेजवानी हिच्यावर आरोप करण्यात आले. शीतल तेजवानी हिने आपल्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे आपल्याला लक्ष केलं जात असल्याचा युक्तिवाद शीतल तेजवानीच्या वकिलांकडून मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठातील सुनावणीत केला होता. मात्र तपासासाठी तिची उपस्थिती गरजेची असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने मांडण्यात आला.यानंतर तिला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली.

महापालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घेण्याचे राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश

आज तिला कोर्टात हजर केले असता सरकारी पक्षाच्या वकिलांकडून जामिनाला विरोध करण्यात आला. सदरील प्रकरणातील जमिनीचे मूळ वतनदार असलेल्या महार वतनदारांचा वंशजांकडून देखील तेजवानीच्या जामिनाला कडाडून विरोध करण्यात आला. शीतल तेजवानी हिने आमची फसवणूक केली असल्याचा दावा महार वतनदारांचा वकिलांनी केला. त्याचप्रमाणे शीतल तेजवानी हिला तिची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला नसल्याचा युक्तिवाद तिच्या वकिलांकडून यावेळी करण्यात आला. युक्तिवाद सुरू असतानाच अचानक तेजवानी हिला चक्कर आल्याचा दावा तिच्याकडून करण्यात आला. त्याची दखल घेत न्यायाधीशांनी तिला समोरील खुर्चीवर बसण्याची परवानगी दिली.तसेच शीतल तेजवानीला मराठी समजत नाही, तरी देखील तिला मराठीतून नोटीस बजावण्यात आली असल्याचा दावा तेजवानीच्या वकिलांकडून करण्यात आला.

follow us