महापालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घेण्याचे राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश

संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी दक्षता घेण्याचे राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश.

  • Written By: Published:
Untitled Design (44)

Mahanagarpalika Elections : महानगरपालिका निवडणुकांच्या मतदारयाद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी देखील दक्षता घेण्याचे निर्देश आज देण्यात आले. त्याचप्रमाणे प्रारूप मतदार याद्यांवरील आलेल्या हरकती आणि सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करण्यास देखील सांगण्यात आलंय. तसेच प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका लक्षात आल्यास तक्रारींची वाट न पाहता स्वतःहून दुरुस्तीची कारवाही करण्यात यावी असं निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले. महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांसंदर्भात सगळ्या महानगरपालिका आयुक्तांची व्हीसीच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी हे देखील यावेळी उपस्थित होते. आयुक्त वाघमारे यांनी यावेळी सांगितलं की, प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची शेवटची तारीख 3 डिसेंबर 2025 पर्यंत होती. त्यानुसार दाखल झालेल्या हरकती आणि सूचनांवर निर्णय घेऊन 10 डिसेंबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करायच्या आहेत. त्याआधी सगळ्या हरकती आणि सूचनांवर योग्य ती कारवाई करून वेळेत निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले. संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेऊन योग्य ती दक्षता घ्यावी, संभाव्य दुबार मतदारांची यादी संबंधित महानगरपालिकेने आपल्या सूचनाफलकावर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन स्टार (**) दर्शविण्यात आलेले आहेत. असा मतदार मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत त्यांना आवाहन करण्यात यावे. आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या मतदाराकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा. अशा मतदाराने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास तो मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल.

हमीपत्राबरोबरच त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल, असेही आयुक्त वाघमारे यांनी सांगितले. काकाणी यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. तिचे केवळ महानगरपालिका निवडणुकासाठी प्रभागनिहाय विभाजन केले जाते. मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. कायद्यातील तरतुदीनुसार या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या तारखेला अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags

follow us