Download App

शशिकांत शिंदे विरुद्ध छ. उदयनराजे : शरद पवारांचा वाघ भाजपला जड जाणार?

1999 सालची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रच जाहीर झाली होती. शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष अगदीच नवीन होता. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी तयार होत होती. त्यामुळे काही ठिकाणी उमेदवारही शोधावे लागत होते. असाच एक मतदारसंघ होता साताऱ्यातील जावळीचा. डोंगराळ आणि घनदाट जंगलाचा भाग असलेला,’जावळीचं खोरं’ म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ तसा आजही अवघडच. घाटमाथ्याच्या शेकडो वाड्या, वस्त्यांमध्ये पसरलेल्या या मतदारसंघातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी त्याकाळी तर नेत्यांना महतकष्ट घ्यावे लागत होते. त्यावेळी जावळीमध्ये सदाशिव सपकाळ हे शिवसेनेचे (Shivsena) आमदार होते. त्यामुळे त्यांना पराभूत करण्यासाठी त्याच तोडीचा उमेदवार द्यावा लागणार होता. (Shashikant Shinde vs Chhatrapati Udayanraje Bhosale will be contested in Satara Lok Sabha Constituency)

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या डोंगराळ पट्ट्यातून त्याकाळी अनेक तरुण मुंबईचा रस्ता धरत होते. यात कराड, पाटण, जावळी या तालुक्यातील गावागावांतील तरुण मुंबईत जाऊन पडेल ते काम करुन हे तरुण धडपडत होते. यातूनच काही जण माथाडी कामगार म्हणून कामाला सुरुवात करत. सदाशिव सपकाळ यांचे वडील पांडुरंग सपकाळही असेच माथाडी कामगार. बाळासाहेब ठाकरे यांनी जावळी तालुक्यातील माथाडी कामागारांची संख्या लक्षात घेऊन मुंबईत काम करणाऱ्या सदाशिव सपकाळ यांना गावाकडे जाऊन शिवसेनेचे काम करायला सांगितले. बाळासाहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून सपकाळांनी 90 च्या दशकात मुंबई सोडली. गावाकडे जाऊन शिवसेनेची शाखा सुरु करण्यापासून काम करु लागले.

राऊत विश्वजीत अन् विशाल पाटलांना टोकाचा निर्णय घ्यायलाच लावणार?; सांगितलं सांगलीसाठी ठाम का…

1990 च्या निवडणुकीत सदाशिव सपकाळ यांनी 20 हजार मते घेतली होती. त्यानंतर 1995 मध्ये त्यांनी बाजी मारलीच. एका माथाडी कामगाराच्या मुलाने पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचा पहिला आमदार होण्याचा बहुमान मिळवला होता. 1999 मध्ये चाणाक्ष शरद पवार यांनीही हेच माथाडी कामागारांचे समीकरण हेरले. त्यांनी तडक माथाडी कामगारांचे नेते असलेल्या शिवारीजाव पाटील यांच्याशी चर्चा केली आणि जावळीसाठी नाव पुढे आले शशिकांत जयवंतराव शिंदे. अचानक आणि अनपेक्षितपणे मिळालेल्या या संधीचे शशिकांत शिंदेंनी सोने केले, मुंबईतून जावळी गाठली अन् सदाशिव सपकाळांचा 12 हजार मतांनी पराभव केला. आता तब्बल 25 वर्षांनंतर याच शशिकांत शिंदे यांना पवारांनी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरवले आहे. आता त्यांच्याविरोधात असणार आहेत, भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले.

यामुळेच पवारांचा हा पठ्ठ्या उदयनराजे आणि भाजपला जड जाणार का? नक्की शशिकांत शिंदे यांची ताकद काय? त्यांची बलस्थान काय हेच आपण समजून घेणार आहोत…

शशिकांत शिंदे यांचे मूळ गाव जावळी तालुक्यातील हुमगाव. त्यांचे वडील जयवंतराव शिंदे हे इतर तरुणांप्रमाणेच माथाडी कामगार होते. माथाडी कामगार नेते आण्णासाहेब पाटील आणि जयवंतराव शिंदे हे एकाच जिल्ह्याचे असल्याने दोघांचेही चांगला स्नेह होता. वडील माथाडी कामगार असल्याने शशिकांत शिंदे हेही मुंबईतच राहायला होता. त्यांनी मुंबईतूनच बीकॉम पर्यंत शिक्षण घेतले आणि ते माथाडी बोर्डात क्लार्क म्हणून नोकरीला लागले. त्यामुळे शिंदे यांचा माथाडी कामगारांचे प्रश्न, त्यांची आंदोलने, त्यांच्या चळवळी या गोष्टींशी त्यांचा लहानपणापासूनच जवळून संबंध आला होता.

याच माथाडी कामगार चळवळीमध्ये शिवाजीराव पाटील यांनी अण्णासाहेब पाटलानंतर माथाडी संघटनेची धुरा हाती घेतली होती. शिवाजीराव पाटील आणि बाबुराव रामिश्ट्ये हे तेव्हाचे जे नेते होते. त्यांच्यामध्ये इथे संघटनेच्या निवडणुकीत जोरदार संघर्ष झाला. त्यावेळी शशिकांत शिंदे यांनी महत्त्वाची आणि आक्रमक भूमिका घेतली. शिवाजीराव पाटील गटाचा विजय झाला. इथूनच शशिकांत शिंदेंचे नेतृत्व उदयास यायला सुरुवात झाले. त्यानंतर त्यांना संघटनेतही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. वेगवेगळे आंदोलन आणि कामगारांच्या लढायांमध्ये शशिकांत शिंदे आघाडीवर दिसून येऊ लागले.

याच आंदोलन, चळवळीमधून शिंदे शरद पवार यांच्या संपर्कात आले. अशात 1999 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पवार यांना जावळी विधानसभेसाठी उमेदवार सापडत नव्हता. पवारांनी शिवाजीराव पाटील यांच्याशी चर्चा केली आणि तिथेच शशिकांत शिंदेंचे नाव पुढे आले. अचानक आणि अनपेक्षितपणे शशिकांत शिंदेंना उमेदवारी देखील देण्यात आली. त्यावेळी तशी त्यांची जावळीशी जवळीक नव्हती आणि त्यांच्यासमोर उमेदवारही तगडा होता. मात्र माथाडी कामगारांच्या प्रश्नांची जाण, त्यांना नेमके काय हवे आहे याची असलेली माहिती, प्रचाराचा झंजावात आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं कसब या बळावर शिंदे यांनी आश्चर्यकारकपणे वयाच्या 38 व्या वर्षी पहिल्याच दमात जावळी विधानसभा जिंकून दाखवली. 2004 मध्ये त्यांनी पुन्हा याच मतदारसंघातून विजय मिळवला.

2009 मध्ये जावळी मतदारसंघ सातारा विधानसभेला जोडण्यात आला. तिथे राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले आमदार होते. त्यामुळे पवारांनी शिंदेंना कोरेगाव मतदारसंघातून तिकीट दिले. कोरेगावमधून राष्ट्रवादीच्या नेत्या, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि त्यावेळच्या महसूल मंत्री शालिनीताई पाटील आमदार होत्या. आपले तिकीट कापून शिंदेंना दिल्याने शालिनीताईंनी बंडखोरी केली. पण शशिकांत शिंदेंपुढे त्यांचा निभाव लागला नाही. शालिनीताईंचा तब्बल 31 हजार मतांनी पराभव झाला. पुढे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही झाले. 2014 मध्ये तर शिंदे यांचा 42 हजारांच्या मताधिक्क्याने विजय झाला. 2019 मध्ये मात्र शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा धक्कादायकरित्या पराभव केला.

नाराजीची धग सांगली मार्गे मुंबई; जागावाटपात काँग्रेसच्या कठोर भूमिकेची गरज होती : वर्षा गायकवाड

हा पराभव पवारांच्या जिव्हारी लागला. पुढच्या अवघ्या चार महिन्यात शशिकांत शिंदेंना विधान परिषदेवर घेत पवारांनी पुन्हा आमदार केले. शशिकांत शिंदे यांनी तब्बल 10 वर्षे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. या काळात त्यांनी साताऱ्याला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवला होता. खासदार राष्ट्रवादीचे, कराड दक्षिण आणि माण-खटाव हे काँग्रेसचे अपवाद वगळता जिल्ह्यातील कराड उत्तर, कोरेगाव, सातारा, वाई, फलटण इथे आमदारही राष्ट्रवादीचे निवडून येत होते. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायती, बाजार समित्या इथे राष्ट्रवादीच्याच घड्याळाचा गजर होऊ लागला. त्यामुळे जिल्ह्याची नस शशिकांत शिंदेंना चांगलीच माहिती आहे.

आज सातारा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे तर पाटण, कोरेगावमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. कराड उत्तर, वाईमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. यातील वाईचे आमदार मकरंद पाटील हे अजितदादांसोबत आहेत. पण मकरंद पाटील यांचे वडील, साताऱ्याचे माजी खासदार लक्ष्मण पाटील यांच्यामुळे शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कराड उत्तरमध्ये शरद पवारांच्या गटाचे बाळासाहेब पाटील आमदार आहेत. या मतदारसंघावर बाळासाहेब पाटलांचे मागच्या पाच टर्म एक हाती वर्चस्व आहे. कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि दिवंगत माजी आमदार विलासकाका उंडाळकर यांच्या गटाकडून शशिकांत शिंदेंना मोठी ताकद मिळण्याचा अंदाज आहे. तर पाटणमध्ये सत्यजीत पाटणकर यांच्यामुळे शशिकांत शिंदेंना मताधिक्य मिळू शकते.

2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना कराड उत्तर, दक्षिण पाटण आणि वाई या चारही मतदारसंघातून जवळपास एक लाख 35 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. केवळ कोरेगाव आणि साताऱ्यातून उदयनराजेंना आघाडी घेता आली होती. त्यामुळे श्रीनिवास पाटील प्रत्यक्ष निवडणुकीत नसले तरी त्यांच्या मदतीने शशिकांत शिंदे यांना या कराडचे दोन आणि पाटण या तीन मतदारसंघामधून मोठी आघाडी मिळू शकते. शिवाय जिल्ह्यातील 25 ते 30 हजार माथाडी कामगारांच्या मतांचाही शशिकांत शिंदे यांना मोठा उपयोग होण्याची चिन्हे आहेत.

थोडक्यात सध्या तरी कागदावर साताऱ्याची परिस्थिती शशिकांत शिंदेंच्या बाजूने आहे. त्यामुळे पवारांचे वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात शशिकांत शिंदेसारख्या तगड्या उमेदवाराविरोधात भाजप कशी रणनीती आखतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. पण छत्रपती उदयनराजे भोसले यांना कडवी लढत मिळणार हे नक्की.

follow us

वेब स्टोरीज