Sunil Tatkare On Madha Loksabha : माढ्यात राजकीय घडामोडींना वेग आला. धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपला राजीनामा दिला असून ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तर अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) हेही महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर रामराजेंची समजूत काढण्यासाठी काही काळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची भेट घेतली होती.
‘…तर तशीच मदत आम्ही आत्ताही केली असती’; पूजा तडस प्रकरणी चाकणकरांचं स्पष्टीकरण
रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे काम न करण्याची भूमिका घेतल्यानंतर अजित पवार बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रामराजे नाईक निंबाळकर, संजय नाईक निंबाळकर, फलटण आणि खटावमधील प्रमुख सहकारी यांच्याशी अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी चर्चा केली. एकंदरीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे समर्थपणे उभं राहण्यासंदर्भात चर्चा झाली. येत्या एक दिवसात सारं काही सुरळीत होईल आणि माढ्याच्या जागेचा तिढा सुटेल, असं तटकरे म्हणाले.
युतीधर्म पाळा – अजित पवार
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांसमोर रणजितसिंह निंबाळकर आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. निंबाळकर आणि गोरे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना त्रास देत आहेत. त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर यांचे काम करणे आम्हाला शक्य नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी अजितदादांसमोर मांडली होती. त्यानंतर अजित पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी युतीधर्म पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती आहे.
नाशिकचा तिढा दोन दिवसात सुटेल
नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकची जागा अजित पवार गटालाच मिळेल असा दावा केला. यावरही तटकरेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, या जागेसंदर्भात अमित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा झालेली आहे
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत. त्यामुळे एक दोन दिवसात बसून या जागेवर निर्णय होईल, असं तटकरे म्हणाले.