सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) आम्ही यापूर्वीही प्रयत्न केलेत आणि इथून पुढेही करणार आहोत. सांगलीची जागा काँग्रेसची (Congress) आहे. इथल्या कार्यकर्त्यांचीही तीच भावना आहे. त्यामुळे सांगलीबाबत पक्षश्रेष्ठींनी पुनर्विचार करावा, अशी मागणी पलूस-कडेगावचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी केली. आज विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासमवेत जिल्हा काँग्रेस समितीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. (Vishwajit Kadam has demanded that the party leaders of the Congress should reconsider regarding the Sangli Lok Sabha constituency.)
स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. अगदी आणीबाणीतही इथून काँग्रेसचा विजय झाला होता. त्यामुले जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस लढवण्यासाठी सक्षम आहे. पण याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी या जागेवर दावा केला. त्यांनी चंद्रहार पाटील यांची अचानक उमेदवारी देखील जाहीर केली. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेबाबत एकतर्फी निर्णय घेण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. पण आम्ही अगदी दिल्लीपासून राज्यात प्रयत्न केले आहेत. यानंतरही या जागेसाठी आम्ही प्रयत्न करत राहु. पक्षश्रेष्ठींनी या जागेबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि मुंबईतील काही जागा वाटपावरून अंतर्गत मतभेद झाले होते. यात सांगलीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये प्रचंड ताणाताणी झाली. ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची परस्पर घोषणा केली. त्यामुळे आमदार विश्वजित कदम, इच्छुक उमेदवार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी थेट दिल्ली गाठून सांगलीची उद्धव ठाकरे यांची मे रोजी सभा जागा सोडू नये, अशी मागणी केंद्रीय नेत्यांकडे केली होती. विश्वजित कदम यांनी मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची आणि नागपूरमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांचीही भेट घेतली होती.
मात्र हा चेंडू सोनिया गांधी यांच्या कोर्टात असल्याचे सांगण्यात येत होते. ठाकरेंकडून सुरुवातीपासूनच याबाबत प्रदेश नेत्यांशी कोणतीही चर्चा न करता राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा केली जात होती. अशात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती. पण सांगलीच्या विषयावर प्रदेश नेत्यांशी कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही राष्ट्रीय नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे, असा निरोप ठाकरेंनी दिला आणि भेट नाकारली. त्यानंतर काल (9 एप्रिल) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पार पडलेल्या एकत्रित पत्रकार परिषदेतही सांगलीची जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षच लढणार असल्याचे तिन्ही पक्षांनी घोषित केले. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून तयारी करत असलेले विशाल पाटील नाराज झाले आहेत.