Download App

धक्कादायक! नांदेड रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरूच; 24 तासात 6 नवजात बालकांसह 15 जण दगावले

नांदेड : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital Death) एकाच दिवशी 24 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर (health system) प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आतापर्यंत एकूण 83 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 37 नवजात बालकांचाही समावेश आहे. अजूनही मृत्यूचं तांडव सुरूच आहे. गेल्या 24 तासांत आणखी 6 नवजात बालकांसह 15 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. (15 people died in Nanded hospital in 24 hours including 6 more newborns)

नांदेडचं शासकीय रुग्णालय हे मराठवाड्यातील दुसरं मोठं रुग्णालय आहे. परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील रुग्ण या रुग्णालयतात उपचारासाठी येत असतात. मात्र, 1 ऑक्टोबर रोजी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 12 नवजात बालकांचा समावेश होता. एकाच दिवसात 24 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सरकारी मनुष्यबळाची कमतरता आणि औषधांचा तुटवडा हा प्रश्न ऐरणीवर आला. आरोग्य यंत्रणेवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

अशातच सलग सातव्या दिवशीही मृत्यूचं प्रमाण सुरूच आहे. रुग्णालयामधील मृत्यूंच सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता गेल्या 7 दिवसांत 37 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.

1 ऑक्टोबर रोजी 12 नवजात बालके, 2 ऑक्टोबर रोजी 4 नवजात बालके, 3 ऑक्टोबर रोजी 2 नवजात बालके, 4 ऑक्टोबर रोजी 5 नवजात बालके, 5 ऑक्टोबर रोजी 4 नवजात बालके, 6 ऑक्टोबर रोजी 1 नवजात बालक आणि 6 ऑक्टोबर रोजी एका नवजात बालकाचा मृत्यू झाला. तर 7 ऑक्टोबर रोजी 6 नवजात बालकांचा मृत्यू झाला.

नवजात बालकांचे दररोज होत असलेले मृत्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. या बालकांच्या मृत्यूची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून या प्रकरणाचा चौकशी अहवाल पाठवण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत.

मृत्यूच्या य़ा घटनेमुळं रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचं समोर आलं. या घटनेनंतर विरोधकांना सरकावर जोरदार टीका केली. आरोग्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. मात्र, नांदेडचं शासकीय हॉस्पिटल आरोग्य विभागाच्या अखत्यारित येत नसल्यचां सांगत आरोग्यमंत्र्यांनी हात झटकले. हायकोर्टाने या मृत्यू प्रकरणी सरकारवर ताशेरे ओढले. सरकार म्हणून जनेतला सुविधा देणं, हे तुमचं काम आहे. तुम्ही यापासून पळ काढू शकत नाही, अशा शब्दात ठणकावलं.

दरम्यान, सरकार शासकीय रुग्णालयातील मृत्यू थांबवण्यासाठी तातडीने काही कार्यवाही करते, की, आणखी मृत्यूंची वाट पाहते, असा सवाल नागरिक करत आहेत

Tags

follow us