Download App

अमरावतीत वातावरण चिघळलं; जमावाकडून पोलीस स्टेशनवर दगडफेक, 21 पोलीस झाले जखमी

गाझियाबादस्थित दासनादेवी मंदिराचे विश्वस्त नरसिंह आनंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाण्यावर काही जण पोहोचले.

  • Written By: Last Updated:

Stone Pelted on Police by Mob in Amravati : शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिस अधिकारी व कर्मचारी, असे २१ जण जखमी झाले. जमावाने पोलिसांच्या (Amravati) दहा वाहनांची तोडफोड केली. त्यात काही दुचाकींचा सुद्धा समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आल्याने तणावपूर्ण शांतता होती.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादस्थित दासनादेवी मंदिराचे विश्वस्त नरसिंह आनंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी रात्री नागपुरी गेट ठाण्यावर काही जण पोहोचले. जमावाला आधी पोलिसांनी शांत करण्याचा प्रयत्न केला होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती कारवाई केली. नागरिकांनी सार्वजनिक सण, उत्सवाच्या काळात शांतता स्थापण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं होतं.

मी कुठं जातोय याला किंमत नाही; अजित पवारांकडं तक्रार करणार, रामराजे निंबाळकर भाजपवर का संतापले?

जमावातील काही लोकांनी अचानक दगडफेक केल्याने वातावरण चिघळले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. त्यानंतर जमावातील मुख्य २६ जणांसह हजार ते बाराशेच्या आसपास लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, असे नागपुरीगेटचे ठाणेदार हनमंत उरलागोंडावार यांनी सांगितलं आहे.

जखमींमध्ये एसआरपीएफ अमरावती शहर पोलीस, क्यूआरटी पथक, होमगार्ड जवानांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने रात्रीच उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परिसरात अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली असून काही भागांत फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. तसंच पोलीस ठाण्यावर व वाहनांवर झालेल्या दगडफेकीमध्ये जवळपास पाच ते सहा लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. सध्या जमावबंदीचे आदेश लागू असून, परिसरात शांतता आहे.

follow us