धाराशिव शहरातील भाग्यानगर परिसरात (Dharashiv) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न होऊन अवघे 30 दिवस होत नाहीत तोच, एका नववधूने आपल्या साथीदारांच्या मदतीने पतीच्या घरातील 17 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केल्याचा प्रकार घ
डला आहे. याप्रकरणी पीडित पती शिवराज (वय २८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, आनंदनगर पोलीस ठाण्यात पत्नीसह एकूण नऊ जणांविरुद्ध फसवणूक, चोरी आणि खंडणीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचे नांदेड जिल्ह्यातील असलेले शिवराज सध्या धाराशिव येथील शासकीय निवासस्थानात राहतात. त्यांचं लग्न 13 मे रोजी तेलंगणामधील बोधन येथील शुभांगी ऊर्फ साक्षी मच्छिंद्रनाथ वारले हिच्याशी झालं. मात्र, लग्नानंतर शुभांगी पतीसोबत नीट वागत नव्हती. यामुळे त्रस्त झालेल्या शिवराज यांनी ही माहिती लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थांना आणि पत्नीच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर गुरुवारी (11 जून) शुभांगीचे नातेवाईक घरात आले आणि तिला समजावून सांगण्याचं नाटक करून, ‘आम्ही हिला समजावून परत पाठवतो’ असं सांगत तिला सोबत घेऊन निघून गेले.
प्रेयसी असताना दुसऱ्या मुलीसोबत लग्न, हळदीच्या कार्यक्रमात तीची एन्ट्री अन्
ते सर्वजण निघून गेल्यानंतर शिवराज पाटील यांच्या लक्षात आलं की, घरातील 17 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 27 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल गायब आहे. त्यांनी तातडीने पत्नीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. परंतु, चोरी केल्यानंतरही आरोपींचं समाधान झाले नाही. शिवराज हे शासकीय पदावर कार्यरत असल्याचा फायदा उठवत, आरोपींनी त्यांची समाजात बदनामी करण्याची आणि प्रतिमा मलिन करण्याची धमकी दिली. ही बदनामी टाळण्यासाठी आरोपींनी थेट 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत त्यांना मानसिक त्रास दिला.
या संपूर्ण फसवणुकीचा पर्दाफाश घरात विसरलेल्या एका मोबाईलमुळे झाला. सर्व पाहुणे पत्नीला घेऊन गेल्यानंतर, बेडरूममधील बेडवर उशाखाली एक मोबाईल फोन सापडला. शिवराज यांनी तो मोबाईल उघडून पाहिला असता, त्यात संबंधित नववधूचे इतर मुलांसोबत लग्न झाल्याचे फोटो आणि विवाहासंबंधीचे चॅटिंग आढळून आले. आपली मोठी फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी 11 जून रोजी आनंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस या टोळीचा पुढील तपास करत आहेत.
