ACB Action On Kiran Choudhary : अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. लाचखोरीच्या प्रकरणात त्यांच्या जळगावमधील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एसीबीच्या पथकाने 24 तास चौधरी यांच्या घरात शोधमोहीम राबवली. या कारवाईत एसीबीने 2 कोटी 94 लाख 64 हजार 847 रुपयांची रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई नाशिक आणि जळगाव एसीबीच्या (ACB) संयुक्त पथकाने इन कॅमेरा केली आहे.
तर दुसरीकडे यापूर्वी 27 जून रोजी जिल्हाधिकारी किरण चौधरी (Kiran Choudhary) यांच्या चुलत्याने सील केलेल्या घराचे कुलूप तोडून आत असलेले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी त्याला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली होती. या घटनेनंतर 2 जुलै रोजी चौधरी यांच्या पत्नी मनीषा चौधरी,नातेवाईक, दोन शासकीय पंच, बँक कॅशियर आणि सोनार यांच्या उपस्थिथीत घराचे सील उघडून ही कारवाई करण्यात आली.
मोठी बातमी! शाळांच्या परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी; मंत्री नरहरी झिरवळांची घोषणा
या कारवाईनंतर एसीबीने (ACB Action) दिलेल्या माहितीनुसार, घरातून 1 कोटी 53 लाख 84 हजार 630 रुपये रोख रक्कम सापडली तर 60 लाख 57 हजार 135 रुपये किमतीचे 422 ग्रॅम सोने आणि 160 ग्रॅम वजनाची दोन बिस्किटे सापडली. याचबरोबर 31 हजार 416 रुपये किमतीची 154 ग्रॅम चांदी आणि 11 लाख 52 हजार 745 रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या सापडल्या आहेत. तर 62 लाख 13 हजार 376 रुपये किमतीच्या वेगवेगळ्या मालमत्तांचे खरेदीखत आणि बक्षीसपत्रांचे दस्तऐवज तसेच 6 लाख 25 हजार 545 रुपये किमतीचे घरातील महागडे सामान या कारवाई जप्त करण्यात आला आहे.
