मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करत मैदानात उतरले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. पण त्यांच्या आंदोलनाचा मार्ग चुकीचा आहे, या आंदोलनाला हिंसक वळण लागत असून न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती सदावर्ते यांनी या याचिकेद्वारे केली आहे. न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेतली असून त्यावर 8 नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार आहे. (Adv. Gunaratna Sadavarte has filed a petition in the High Court against Maratha reservation)
सदावर्ते हे मागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याच याचिकेवरुन मराठा आरक्षण रद्दबातल करण्यात आले होते. याशिवाय ते मराठा समाज आणि विविध राजकीय नेत्यांवर उघडपणे आगपाखड करत असतात. यामुळे संतप्त मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांनी गत आठवड्यात त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. यानंतर तोडफोड करणाऱ्यांना अटक आणि जामिनावर सुटकाही झाली.
त्यानंतर राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच तापले आहे. आंदोलकांनी महाराष्ट्राभरात हिंसक निदर्शने केली. मराठवाड्यात या आंदोलनाचे हिंसक पडसाद पाहायला मिळाले होते. मनोज जरांगे यांचे उपोषण, दगडफेक आणि जाळपोळ अशा हिंसक घटनानंतर मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काल (1 नोव्हेंबर) राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, यामध्ये ठोस झाला नाही. सरकारने वेळ देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या आंदोलनाची धग अद्याप कायम आहे. अशात आता सदावर्ते यांनी थेट न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पाण्याला हात लावणार नाही – जरांगे पाटील
गेल्या 8 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषणावर असलेले मनोज जरांगे यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. जरांगे यांनी सांगितले की, राज्य सरकारविरोधात जनतेत रोष आहे. आरक्षण मिळेपर्यंत आता पाण्याला हात लावणार नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईतून मी माघार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
सरकारला आरक्षण द्यावेच लागणार
मी पाणी सोडले, आता मी पाणी घेणार नाही. मला माझ्या जातीवर अन्याय मला सहन होणार नाही. जाणून बुजून मराठा तरुण कार्यकर्त्यांवर सरकारने खोटे गुन्हे दाखल केल्या आहेत. जाणूनबुजून प्रशासन सरकारच ऐकून आंदोलकांचा छळ करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी यावेळी केला. आता मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. असे आंदोलनाचे 6-7 टप्पे होणार आहेत. या एखाद्या टप्प्यात सरकारला आरक्षण द्यावेच लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.