मुंबई : ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या संंबंधितांना अर्थात सगेसोयऱ्यांनाही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये कुणबी संवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या 26 जानेवारीपासून ते मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढत ते हजारो कार्यकर्त्यांसोबत मुंबईत दाखल होणार आहेत. यासाठीची त्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. (After Manoj Jarange Patil’s strike warning, Shinde government and police are on high alert.)
एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारही हायअलर्टवर आले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा प्रश्न तापवत असल्याने आणि मुंबईत येत असल्याने सरकारबद्दल राज्यभरात चुकीचा संदेश जाऊ शकतो, या भीतीने त्यांच्यावर उपोषणाची वेळच येऊ न देता त्यांना अंतरवाली सराटीतच थांबवण्यासाठी शिंदे सरकारचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
राज्य शासनाने सगेसोयरे या मुद्द्यावरील अध्यादेशाचा अंतिम मसुदा तयार केला असून लवकर यावर कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आहे. हा नवीन ड्राफ्ट हा ड्राफ्ट जरांगे पाटील यांनाही देण्यात येणार आहे. या ड्राफ्टच्या निमित्ताने मुख्यमंत्री कार्यालयाच्या पातळीवर आमदार बच्चू कडू, तसेच मुख्यमंत्र्यांच्या टीममधील सदस्य जरांगेंच्या संपर्कात आहेत. त्यांना मुंबईत न येण्याचे आवाहन केले जात आहे.
शासनाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल या चार महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचा डाटा गोळा करण्याचे काम या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. येत्या 10 दिवसात घरोघरी जाऊन त्यांना डाटा गोळा करायचा आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत महिन्यात हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येईल अशी घोषणा केली आहे. याची आठवणही जरांगे यांना करुन दिली जात आहे.
मात्र 20 तारखेपर्यंत या गोष्टी न झाल्यास आणि जरांगे पाटील मुंबईला येण्यासाठी निघाल्यास पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. जरांगे पाटील यांच्या दौऱ्यातील बहुतांश भाग हा पुणे, नवी मुंबई आणि मुंबई पोलीस प्रशासनावर देण्यात आला आहे. इथली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या तिन्ही विभागातील पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण विभागातील सर्व पोलिसांच्याही सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीतील सध्याच्या तयारीवर आणि जालना जिल्ह्यातील पहिल्या दिवसाच्या दौऱ्यावर जालना जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकावडे विशेष लक्ष ठेवून आहेत. याशिवाय अहमदनगर आणि बीडच्या पोलीस अधिक्षकांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. जरांगे पाटील यांच्याशी रोज संवाद साधण्याची, पदयात्रेमध्ये कोठेही कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का न लागण्याची जबाबदारी छत्रपती संभाजीनगरच्या विशेष पोलीस महानिदेशकांकडे देण्यात आली आहे. या सर्व पोलीस प्रशासनावरील नियंत्रण आणि नियमनाची जबाबदारी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे देण्यात आली आहे.
जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत आल्यास वाहतूक आणि इतर गोष्टींचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोर्चा मुंबईत न आणता तो नवी मुंबईत पनवेल अथवा बेलापूर या ठिकाणी थांबण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यासाठी तशी विनंती जरांगे पाटील यांना करण्यात येणार आहे. जर ही मागणी मान्य केली नाही तर कायद्याने हा मोर्चा मुंबईत येणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. याशिवाय या मोर्चासाठी कुठून लोक अपेक्षित आहेत, त्यांची वाहन कोण पुरवणार? जेवणाची व्यवस्था कोण करणार? मोर्चासाठी निधी कुठून येणार यावर विशेष नजर ठेवण्यात येत आहे. त्याच बरोबर याविषयीच्या महितीची मागणी जरांगे यांच्याकडे देखील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.