Ahilyanagar District Bank Election : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी जिल्ह्यातील निवडक नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे प्रा. शिंदे बँकेच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे मानले जाते. त्या पाठोपाठ आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही भेटीगाठीला सुरवात केली आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचीही विखे पिता-पुत्रांनी भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे सहमतीचा प्रयोग यशस्वी झाला, तर यावेळी बँकेत अनेक नवे आणि तरुण चेहरे दिसण्याची शक्यता आहे.
बँकेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांचे राजकारण आणले जात नाही, असे सांगत सहमती घडवून आणण्याचे प्रयत्न विखे पाटील यांच्याकडून सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते आणि विखे पाटील यांचे कायमचे राजकीय प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांचीही संमती असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अशी सहमती होऊन निवडणूक बिनविरोध करायची ठरली तर सुरवातीलाच वेगळी भूमिका घेतलेल्या प्रा. शिंदे यांचे यात स्थान काय असेल, याची आता उत्सुकता लागली आहे.
प्रा. शिंदे यांनी गेल्या महिन्यात जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. अधिकृत दौरे आखून त्यांनी भेटी घेतल्या. सहकाराचे राजकारण समजून घेण्यासाठी आपण भेटी घेत असल्याचे ते सांगत होते. मात्र, आतापर्यंत सहकार आणि बँकेच्याही राजकारणात लक्ष न घातलेल्या शिंदेच्या या भेटीगाठी लक्षवेधक ठरल्या. भाजपमधील दोन गटांचा संदर्भही त्याला जोडण्यात आला. त्यानंतर आता विखे पाटील यांनी सुरूवात केली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात तर त्यांनी पाचपुते आणि नागवडे या दोन पारंपरिक विरोधी गटांत सहमती घडवून आणण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे तेथील निवडणूक बिनविरोध होण्याची शिवाय तालुक्यात दोन संचालक मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाचपुते आणि नागवडे या दोन्ही गटांना संधी मिळू शकेल. त्यानंतर आता पालकमंत्री विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते गडाख यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी शिंदे यांनी भेट घेतल्यानंतर विखे यांनीही गडाखांची भेट घेणे, हे बँकेच्या सहमतीच्या राजकारणासाठीच असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच विखे- गडाख खटल्याचा जुना संदर्भ देत नेवासा तालुक्यातील भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांनी विखे यांनी गडाख यांची भेट घेण्यावर टीकाही केली आहे. अर्थात अशीच टीका राम शिंदे यांनी गडाखांची भेट घेतल्यावरही झाली होती.
जिल्हा बँकेसाठी डॉ. विखे यांचे नाव पुढे करण्यात येत असल्याचे संकेत मिळाल्यावर राम शिंदे यांनी भेटी घेतल्या, त्या विखे विरोधकांची मोट बांधण्यासाठी होत्या, असा अर्थ राजकारणात लावला गेला. आता विखे पाटील यांनीही भेटी गाठी सुरू केल्या. त्यांच्या या भेटीगाठी बँकेची सत्ता प्रस्थापितांच्या हातून जाऊ नये, यासाठी सहमती घडविण्यासाठी असल्याचे बोलले जाते. बँकेत अनुभवी मंडळी असावी, तेथील कारभार पक्ष विरहित असावा, अशी विधाने यापूर्वी विखे पाटील यांच्याकडून झाली आहेत. याच मुद्द्यावर थोरातांचीही संमती असल्याचे मानले जाते.
कोणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही ; शिवसेना-धनुष्यबाण शिंदेंचाच; संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?
असे असले तरी यावेळी बँकेत अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. तरूण पिढीला पुढे करायचे, आणि दिग्गज नेत्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायचे, अशीही सहमती होऊ शकते. यावेळी स्वतः शिंदे यांच्या नावाने कर्जत आणि जामखेडमधून ठराव झालेले आहेत. त्यामुळे तेही निवडणुकीत उतरू शकतात. निवडणूक बिनविरोध करायची ठरली तर त्यांच्या बाबतीत काय निर्णय होऊ शकतो? यावेळी कसेही करून शिंदे यांचा बँकेत प्रवेश होणार का? झालाच तर तर त्यांचे स्थान काय असेल? शिंदे यांनी भेटी घेतलेले नेते खरेच विखे यांच्या विरोधात भूमिका घेतील का? मुख्य म्हणजे यात राजस्तरावरील नेते लक्ष घालणार का? आणि घातले तर कोणाच्या पारड्यात त्यांचे वजन पडणार? यासंबंधी आता जिल्ह्यात उत्सुकता आहे.
