जिल्हा बँक! विरोधकांची मूठ बांधत विखेंचा डाव…शिंदेंनी दिला इशारा
Ahilyanagar District Central Cooperative Bank Elections : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील
Ahilyanagar District Central Cooperative Bank Elections : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकरण चांगलेच तापणार असे दिसून येत आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी संगमनेरमध्ये सर्व लोकप्रतिनिधी हे जमा झाले होते. एकमेकांचे राजकीय विरोधक देखील यावेळी एकत्र दिसले. यामध्ये विखे , थोरात , कोल्हे तसेच विरोधीपक्षातील ओगले हे देखील उपस्थित होते. मात्र यावेळी केवळ विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे व खासदार निलेश लंके हे अनुपस्थित होते. बिनविरोधासाठी विखे प्रयत्नशील आहे, मात्र आता इगो ठेवला तर निवडणूक बिनविरोध होणार नाही असं वक्तव्य राम शिंदे यांनी केले आहे. यामुळे या निवडणुकीमध्ये पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कट्टर विरोधक एकाच मंचावर
अहिल्यानगर जिल्हा बँकेची आगामी निवडणूक कोणत्याही वादाशिवाय आणि पूर्णपणे बिनविरोध पार पाडावी, यासाठी ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये विशेष ठरले म्हणजे कट्टर राजकीय विरोधक या निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकत्र आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे (BJP) नेते सुजय विखे पाटील या निवडणुकीच्या निमित्ताने संगमनेरमध्ये एकाच मंचावर एकत्र आले होते.
विशेष म्हणजे बैठक संपल्यानंतर सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. या राजकीय घडामोडीमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे यांनी यापूर्वीच या निवडणुकीबाबत बोलताना म्हणाले होते की, अशा निवडणुका या बिनविरोध देखील होऊ शकतात व नुकतेच झालेल्या या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधी एकाच मंचावर दिसून आल्याने निवडणूक बिनविरोधासाठी विखे यांचा पुढाकार दिसून येत असल्याचे देखील अधोरेखित होते आहे.
इगो ठेवाल तर निवडणूक बिनविरोध नाही…शिंदेंचा इशारा
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधाचे वारे वाहू लागले असून, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दिलेल्या हाकेचा आणि भूमिकेचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे, असे मत आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केले. मात्र, कोणाकडे अहंकार (‘ईगो’) असेल आणि जिरवाजिरवीचे राजकारण होणार असेल, तर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
FDA अधिकारी ब्लॅकमेल करून पैसे घेतात अन्… संजय राऊताचं थेट तुकाराम मुंढेंना पत्र
जिरवाजिरवीचे राजकारण बाजूला ठेवा
शिंदे म्हणाले की, तुझी-माझी खेचाखेच आणि जिरवाजिरवीचे राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. शेवटी ही एक आर्थिक संस्था असून ती ठेवीदार आणि कर्जदार दोघांच्याही हिताचे रक्षण करते . ही बँक बिनविरोध झाली तर निश्चितच चांगले होईल. परंतु यासाठी प्रत्येकाचा मानसन्मान राखला गेला पाहिजे. कोणीही अहंकारी बनून निर्णय लादण्याचा प्रयत्न केला, तर निवडणूक बिनविरोध होईल असे मला वाटत नाही.