Alleged audio clip of former minister Tanaji Sawant goes viral : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच माजी मंत्री तानाजी सावंत यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये मतांसाठी थेट पैशांचे वाटप करण्याच्या सूचना दिल्याचा दावा केला जात असून, यामुळे एकच राजकीय खळबळ उडाली आहे.
व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये परांडा मतदारसंघात मतदारांना पैसे देऊन मतदान करून घेण्याबाबत चर्चा होत असल्याचा आरोप केला जात आहे. या क्लिपमध्ये मुस्लिम आणि दलित मतदारांना प्रत्येकी एक हजार, दोन हजार ते तीन हजार रुपये देण्याच्या सूचना दिल्याचा दावा करण्यात येतो. इतकेच नव्हे, तर “याद्या करा, मला पाठवा, नुसते गोड बोलू नका, थेट पैसे द्या” असे शब्द वापरल्याचेही या क्लिपमध्ये ऐकू येत असल्याचा आरोप आहे.
या कथित संभाषणात दोन कोटी ते तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी असल्याचा उल्लेख असून, “सभा चांगली झाली म्हणजे काम झाले असा भ्रम ठेवू नका, पैसे वाटून मतदान करून घ्या” अशा प्रकारचे निर्देश दिल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे परांडा मतदारसंघात पैशांची ‘ढगफुटी’ झाल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, आरोग्य खात्यातील कथित भ्रष्टाचारातून जमा झालेला पैसा निवडणुकीत वापरला जात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. मात्र हे आरोप सध्या केवळ व्हायरल ऑडिओवर आधारित असून, या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेली नाही.
भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार; भारतासाठी संधींचा नवा अध्याय
या प्रकरणामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पैसे पोहोचतात की ते मधल्या यंत्रणेतच अडकतात, हा देखील संशोधनाचा विषय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून या व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर या आरोपांना पुष्टी मिळाली, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे संकेत जाणकारांकडून दिले जात आहेत.
आता या संपूर्ण प्रकरणात पुढे काय कारवाई होते, ऑडिओ क्लिपची सत्यता काय निष्पन्न होते आणि निवडणूक आयोग यावर कोणती भूमिका घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
