Balasaheb Thorat : संगमनेरचे आमदार आणि शिवसेना नेते अमोल खताळ यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका फेटाळण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. थोरात यांनी अमोल खताळ यांच्या निवडणुकीला आव्हान देत अमोल खताळ यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि कर थकबाकी जाहीर केली नसल्याचा आरोप औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.
ही याचिका रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आमदार खताळ (Amol Khatal) यांनी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटळाला असून आता या प्रकरणाची सुनावणी 7 मे रोजी न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. राज्य सरकाच्या वेबसाईटचा आधार देत बाळासाहेब थोरात यांनी आमदार खताळ विरोधात पुरावे दिल्याने न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारली आहे.
अमोल खताळ हे नीलकमल नावाच्या फर्ममध्ये भागीदार असून या फर्मवर व्यावसायिक कराची थकबाकी असल्याचा दावा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी या याचिकेत केला आहे. अमोल खताळ यांनी या फर्मसोबतचा आपला संबंध उघड केला नाही. त्यांनी फॉर्म 26 मध्ये सरकारी देयकांखील शून्य असे घोषित केल्याचा आरोप देखील या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच ही थकबाकी 25000 रुपये असून त्यावर 26,650 रुपये व्याज असल्याची माहिती न्यायालयाला थोरात यांनी या याचिकेद्वारे दिली आहे.
थोरातांची मागणी काय?
आमदार आमोल खताळ यांनी त्यांचे उत्पन्नाचा स्त्रोत लपवल्याने लोकप्रतिनिधित्व कायदाच्या कलम 100(1)(B), 100(1)(D)(i) आणि 100(1)(D)(iv) अंतर्गत त्यांचा विजय अवैध घोषित करण्यात यावा आणि कलम 101(B) अंतर्गत स्वत:ला रीतसर निवडून आलेले घोषित करण्याची मागणी या याचिकेतून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलीय.
शिवसेनेकडून विभागीय संपर्कप्रमुखांची घोषणा; उत्तर कोकणच्या विभागीय संपर्कप्रमुखपदी भरत गोगावले-
आमदार अमोल खताळ यांचा अर्ज फेटाळला
तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेली ही याचिका फेटाळण्यासीठी आमदार खताळ यांनी अर्ज दाखल केला होता. खताळ यांच्या या अर्जावर सुनावणी झाली. या सुनावणीत आता फर्ममध्ये भागीदारी नाही आणि नीलकमल फर्म विसर्जित झाली आहे असा युक्तिवाद खताळ यांच्याकडून करण्यात आला पण थोरात यांनी फर्मची स्थिती सक्रिय असल्याची माहिती जीएसटी वेबसाइटवरुन न्यायालयासमोर दिल्याने खताळ यांचा अर्ज फेटाळण्यात आला. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता.
