अहिल्यानगर तालुक्यात खडकी परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. (Hake) येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात हाके यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या असल्याचे समजते. या घटनेची माहिती कळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
अहिल्यानगर जवळ असलेल्या अरणगाव बाह्यवळण रस्त्यावर नाश्ता करून पुढे जात असताना अज्ञात तरुणांनी काठ्यांनी वाहनावर हल्ला केला. आज (ता. २७) पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हाके जात होते. दुपारी ती सभा होती. हल्ला झाला त्यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त होता. अहिल्यानगर येथे वाहनावर झालेल्या हल्ल्यात लक्ष्मण हाके यांना काही झालेलं नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
वाघमारेंची गाडी जाळली आता हाकेंच्या सहकाऱ्यावर हल्ला, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
आज लक्ष्मण हाकेंची पाथर्डी येथे सभा आहे. पुण्याहून लक्ष्मण हाके सभेसाठी पाथर्डी येथे चालले होते. तेव्हाच मध्येच रस्त्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. हे हल्ला करणारे कोण होते? त्यांची माहिती मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहं.
दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणारे तिघे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. हाके यांच्यावर अहिल्यानगर तालुक्यातील अरणगाव शिवारात हल्ला झाला होता.