दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारे मैदानात; उद्या अहिल्यानगरात मौन आणि धरणे आंदोलन

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील या विषयावर भूमिका घेतली आहे.

Untitled Design (72)

Untitled Design (72)

Anna Hazare’s silence and sit-in protest : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील या विषयावर भूमिका घेतली आहे. लोकशाही व्यवस्थेत संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथे मौन धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे आंदोलन गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत गांधी स्मारक, वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे होणार आहे. विशेष म्हणजे या आंदोलनस्थळाला प्रतीकात्मक स्वरूपात नगरचे जंतर मंतर असे नाव देण्यात आले आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाशी एकात्मता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

आयोजकांच्या मते, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीकडे देशाचे लक्ष वेधणे, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी आणि कोणत्याही प्रश्नाचे समाधान संवादातूनच शोधले जावे, हा या आंदोलनामागील मुख्य उद्देश आहे. या मौन धरण्यातून दडपशाही नव्हे, संवाद हवा, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, लोकशाही आणि संविधानाचे रक्षण झाले पाहिजे, असे संदेश शांततामय पद्धतीने देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न केवळ आंदोलनाने किंवा संघर्षाने सुटणार नाहीत, तर त्यासाठी लोकशाही पद्धतीने चर्चा आणि संवाद आवश्यक असल्याची भूमिका या आंदोलनातून मांडली जाणार आहे.

Neet Paper Leak : कॉंग्रेसच्या पवित्र्यात मोठा बदल..’आधी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मग चर्चा’, सत्ताधाऱ्यांची नस पकडली!

अण्णा हजारे यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक आणि लोकहिताच्या प्रश्नांवर शांततामय आंदोलनाच्या माध्यमातून जनमत जागृत करण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या आंदोलनाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळणारा वाढता सामाजिक पाठिंबा आणि विविध स्तरांतून व्यक्त होत असलेली सहानुभूती यामुळे या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या मौन धरणे आंदोलनात विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन आंदोलन कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळेत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून सहभागी नागरिकांनी छत्री किंवा रेनकोटसोबत उपस्थित राहावे, असेही सांगण्यात आले आहे.

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेले हे मौन धरणे अहिल्यानगरातील एक महत्त्वपूर्ण सामाजिक आणि लोकशाहीवादी उपक्रम ठरणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Exit mobile version