दहीहंडी केली तर एन्काउंटर करू; पोलिसांवर दमबाजीचा आमदार संग्राम जगतापांचा गंभीर आरोप
दहीहंडी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग असल्याचे सांगत जगताप यांनी पोलिसांच्या कथित भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
अहिल्यानगरमध्ये दहीहंडी उत्सवाच्या (Ahilyanagar) पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी गंभीर आरोप केला आहे. शहर डीवायएसपी दिलीप टिपरसे यांच्या सांगण्यावरून पोलिस गोपनीय शाखेचे असल्याचे सांगत सिव्हील ड्रेसमध्ये दहीहंडीच्या ग्रुपमध्ये शिरत असल्याचा दावा जगताप यांनी केला. गर्दीत अशा पद्धतीने पोलिसांनी सहभागी होऊ नये, यावरून वाद निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दहीहंडीच्या वेळी पोलिसांकडून उत्सव साजरा करणाऱ्या तरुणांच्या ग्रुपमध्ये सिव्हील ड्रेसमध्ये प्रवेश केला जात असल्याचा आरोप आमदार जगताप यांनी केला. पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी गर्दीमध्ये पोलिसांनी अशा पद्धतीने शिरणे योग्य नसल्याचे म्हटले. याच मुद्द्यावरून पोलिस आणि दहीहंडी आयोजकांमध्ये वाद झाल्याचा दावाही त्यांनी केला.
नांगरे पाटलांचे घूमजाव, नागपुरात सरसकट DJ बंदी नाहीच
यावेळी पोलिसांकडून दहीहंडी साजरी करू नका, अन्यथा एनकाऊंटर करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप जगताप यांनी केला आहे. एकीकडे राज्यात आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे दहीहंडी साजरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून अशा प्रकारे दम दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला.
दहीहंडी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग असल्याचे सांगत जगताप यांनी पोलिसांच्या कथित भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असली तरी त्यासाठी नागरिकांना धमकावणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या या गंभीर आरोपांवर पोलिस प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.