दहिहंडीच्या जल्लोषाला गालबोट; मालाडमध्ये 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, उंच थर आणि परिसरातील सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 05T170158.740

गोपाळकाला आणि दहिहंडीच्या उत्साहात मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये जल्लोष सुरू असताना मुंबईतील मालाडमध्ये दुर्दैवी घटना घडली. दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असताना बाजूचा कॉलम कोसळल्याने 7 वर्षीय मुलाला डोक्याला गंभीर मार लागला. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून, उत्सवाच्या आनंदावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

दरम्यान, दहिहंडी उत्सवात आतापर्यंत 32 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, उंच थर आणि परिसरातील सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. उत्सव साजरा करताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दहीहंडीच्या उत्साहाला डीजेचा अडथळा; पुण्यात पहिल्याच मंडळावर पोलिसांची कारवाई

32 जखमी गोविंदाचं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सीटी रुग्णालयात 29 जखमी गोविंदाना दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी 25 जणांवर उपचार करून सोडलं. अजूनही चार गोविंदावर उपचार सुरू असून त्यांची स्थिती स्थिर असल्याचं बोललं जात आहे. ईएस रुग्णालयात 2 गोविंदा जखमी आहेत. डब्ल्यूएस रुग्णालयात आणखी एक गोविंदा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आलं आहे. हा आकडा 5 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतचा आहे. जखमींचा आकडा रात्रीपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोविंदांनी उत्साहाच्या भरात कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी काळजी घ्यावी.

पुण्यात महिलेचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. लोखंडी कमान कोसळल्याने 45 वर्षीय सलमा पठाण यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, रात्री दहीहंडीची सजावट काढण्याचं काम सुरू असताना लोखंडाचा तुकडा त्यांच्या डोक्यावर पडला. त्यानंतर गंभीर अवस्थेतच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सलमा पठाण यांच्या निधनानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

follow us