Asim Sarode On Akshay Shinde Encounter : बदलापुरात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा मृत्यू झाला आहे. त्याने पोलिसाची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहे. यावर आता आता वकील असीम सरोदेंनी (Asim Sarode) प्रतिक्रिया दिली.
शिंदेने बंदूक हिसकावली अन् पोलिसांनी तीन गोळ्या झाडल्या, कसं झालं बदलापूर आरोपीचं एन्काऊंटर?
बदलापूर आरोपी एन्काऊंटर प्रकरणी सरोदेंनी अनेक सवाल उपस्थित केलेत. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली त्यात त्यांनी लिहिलं की, बदलापूर घटनेतील अत्याचारग्रस्त मुलीच्या व तिच्या परिवाराच्या बाजूने वकीलपत्र दाखल केल्यापासून मी एक वेगळाच दबाव पाहत आहे. आरोपीला कारागृहातून थेट न्यायालयात नेणे आवश्यक असताना त्याला बदलापूर पोलीस्ट स्टेशनला का नेण्यात आलं? पोलीसांची बंदूक सामान्यतः लॉक असते, ती आरोपीने कशी वापरली?, असा सवाल त्यांनी केला.
पुढं त्यांनी लिहिलं की, पोलिसांवर दबाव होता. येथील राजकीय लोकांची प्रतिष्ठा महत्त्वाची होती आणि त्याला ठरवून स्वत:ला मारून घेण्याची परिस्थिती तयार करून देण्यात आली का? आम्ही उच्च न्यायालयाच्या लक्षात उद्याच हा सगळा प्रकार आणून देणार आहोतो शेवटी राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाल्यानंतर राज्य सरकार आणि पोलिसांच्या कारभारावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. विजय वडेट्टीवार यांनी याप्रकरणी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट करत या पोलीस चकमक प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. कायदा व सुव्यवस्थेवर कोणाचेही नियंत्रण नाही. गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनीही या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली.
दरम्यान, या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.