Akshay Shinde Encounter : आरोपीच्या हाती बंदूक कशी आली? या प्रकरणाची न्यायिक चौकशी करा; वडेट्टीवारांची मागणी
Akshay Shinde Encounter : बदलापुरात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा मृत्यू झाला आहे. त्याने पोलिसाची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे!
अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का??
अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली?
आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू…— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 23, 2024
आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार यांनी एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी लिहिलं की, अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात, असे सवाल वडेट्टीवार यांनी केले.
बदलापूर प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, विरोधकांनी केला एन्काउंटरचा आरोप
पुढं वडेट्टीवार यांनी लिहिलं की, बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी संबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वत:वर गोळी झाडून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे… बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आमची मागणी आहे की, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं.
तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनीही या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली. दरम्यान, या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तर दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्याने पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र आता मुंब्रा बायपास येथे अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर झाला अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदेनं 2 गोळ्या झाडल्या तर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर तीन गोळ्या झाडले अशी देखील माहिती समोर आली आहे.