Baba Siddique Murder Case : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या (Baba Siddique Murder) प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार हत्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींवर आता मकोका (MCOCA) अंतर्गत न्यायालयात खटला चालणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील 3 मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103(1), 109, 125 आणि 3(5) चा तपास करत आहे. पोलिसांनी आतापर्यंत 26 आरोपींना अटक केली आहे. तर शुभम रामेश्वर लोणकर, जिशान मोहम्मद अख्तर आणि अनमोल बिश्नोई हे तीन आरोपी या प्रकरणात वॉन्टेड आरोपी आहेत. तर आता आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, 1999 (मकोका कायदा) मधील तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींविरोधात देखील मुंबई पोलिसांनी मकोका लावला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर (शनिवारी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी 12 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्या ऑफिस बाहेर असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
तीन वेळा आमदार
काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम करत त्यांनी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी यांनी 1999, 2004 आणि 2009 मध्ये वांद्रे पश्चिममधून विधानसभेची निवडणूक जिंकली होती. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आशिष शेलार यांनी त्यांचा पराभव केला होता. नोव्हेंबर 2004 ते डिसेंबर 2008 या काळात ते कामगार, अन्न नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री होते.
देशाच्या येणाऱ्या पिढीला प्रशिक्षित करण्याचं काम भारतीय जैन संघटना करतेय ; देवेंद्र फडणवीस
MCOCA म्हणजे काय ?
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच MCOCA महाराष्ट्र सरकारने 1999 मध्ये लागू केला. राज्यातून संघटित गुन्हेगारी रोखणे हा त्याचा उद्देश आहे. हा कायदा दिल्लीतही लागू आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 2002 मध्ये राष्ट्रीय राजधानीत याची अंमलबजावणी केली होती.