Baban Gitte : परळीतील बापू आंधळे खून प्रकरण पुन्हा समोर आलं आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. (Parali) बापू आंधळे खून प्रकरणानंतर फरार असलेल्या बबन गित्तेच्या संपत्तीवर आता टाच येणार आहे. बबन गित्ते याच्या संपत्तीची माहिती पोलिसांनी जमा केली आहे. ही संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली जाणार आहे.
संपत्तीवर येणार टाच
29 जून 2024 रोजी परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाला होता. या प्रकरणात बबन गित्ते फरार आहे. बबन गित्ते याला अधिकृतरित्या फरार घोषित केल्यानंतर त्याच्या संपत्ती जप्तीचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. यासाठी त्याच्या संपत्तीची माहिती जमा केली जातेय. पुढील दोन दिवसात न्यायालयाकडे संपत्ती जप्तीसाठी परवानगी मागितली जाणार आहे. त्यामुळे बबन गित्ते याच्या संपत्तीवर टाच येणार असल्याने शरणागती शिवाय बबन गित्तेकडे पर्याय राहणार नाही.
बबन गित्ते खरचं आरोपी? आमदार सुरेश धस यांचा मोठा गौप्यस्फोट
या प्रकरणात तपास पूर्ण करून पोलिसांनी दोषारोपपत्र अंबाजोगाई न्यायालयात दाखल केलेले आहे. बबन गित्तेच्या अटकेनंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान आंधळे खून प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दिल्या गेल्या होत्या. एकूण 11 जणांवर गुन्हा नोंद होता. यात वाल्मिक कराड विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. मात्र परळी पोलिसांनी तपासात वाल्मिक कराडचा सहभाग नसल्याचे सांगून त्याचे नाव आरोपीतून वगळले आहे. उर्वरित आरोपी अटक असून केवळ बबन गित्ते फरार आहे. आता फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर टाच येणार आहे.
आठ महिन्यांपासून बबन गित्ते फरार
बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते याच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून झालेल्या आणि खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तींना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यभर तापू लागलंय. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि खून प्रकरणातील आरोपी बबन गित्ते अद्याप समोर आलेला नाही. गेल्या आठ महिन्यांपासून बबन गित्ते फरार आहेत.