Bhaskar Kendre and Gunaratna Sadavarte Call Recording : संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर परळी शहर आणि बीडमधील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांबाबत संशयाचं ढग निर्माण झालं आहे. पोलीस भास्कर केंद्रे यांच्या मालकीचे 100 टिप्पर आणि 15 जेसीबी असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर भास्कर केंद्रे यांनी गुणरत्न सदावर्तेयांच्याशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. भास्कर केंद्रे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळतानाची मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
वाल्मीक कराडची शरणागती, विरोधक सरकारवर तुटून पडले..
या व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये भास्कर केंद्रे म्हणतात की, टिप्पर सोडा माझ्याकडं किंवा माझ्या नातेवाईकांकडं साधं टायर सापडलं तरी मी पोलीस खात्यातून एका मिनिटात राजीनामा देईन. हे कशामुळे माझ्यावर आरोप करत आहेत, तेच समजत नाही. माझ्याकडे दोन टिप्पर असते आणि यांनी 100 टिप्पर असल्याचा आरोप केला असता तर ठीक होते. मला जेसीबी आणि पोकलेनमधील फरकही कळत नाही. माझा या सगळ्याशी काही संबंध नाही. तुम्ही परळी शहरात किंवा आमच्या गावाकडे पाठवून कोणाकडेही चौकशी करा. मी आता माझ्या मुलीचं लग्नही कर्ज काढून केलं आहे, असा दावा भास्कर केंद्रे यांनी केला आहे.
नेमके काय आरोप केले होते?
संतोष देशमुख यांचा मारेकरी असल्याचा आरोप असलेल्या विष्णू चाटे आणि भास्कर केंद्रे याचे संबंध असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. भास्कर केंद्रे हा 15 वर्षापासून परळी पोलीस ठाण्यातच आहे. त्याच्याकडे 15 जेसीबी आणि 100 टिप्पर आहेत. यामधून तो राखेची अवैध वाळू वाहतूक करतो. त्याची परळीतील मटका व्यवसायातही भागीदारी असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता.
सुदर्शन घुले आज पुन्हा न्यायालयासमोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. मोबाईल फोनशी संबंधित पुराव्यांचा तपास करण्यासाठी एसआयटीने त्याची पोलीस कोठडी मागून घेतली होती. या कोठडीची मुदत आज संपत आहे. त्यामुळे एसआयटी त्याची पुन्हा पोलीस कोठडी मागते की त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले जाते, हे बघावे लागेल.