भंडाऱ्यात तीन घटनांनी खळबळ; शेतीच्या वादातून सासऱ्यावर हल्ला, धान चोरी आणि अपघातात तरुणाचा मृत्यू

Dispute over farmland : भंडारा जिल्ह्यात शेतीच्या वाटणीवरून जावयानं सासऱ्यावर चाकूनं हल्ला केल्याची घटना घडली आहे.

News Photo   2026 10 11T175451.941

Bhandara News

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील मडेघाट येथे वडिलोपार्जित शेतीच्या वाटणीवरून जावयानं सासऱ्यावर चाकूनं हल्ला केल्याची घटना घडली आहे. (Agriculture) शेतीतील हिस्सा पत्नीला न देता स्वतःला मिळावा, या मागणीवरून राहुल राऊत (३४) याचा सासरे दीपचंद ढोरे (४७) यांच्याशी वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर राहुलनं त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला. यात दीपचंद ढोरे गंभीर जखमी झाले असून, त्यांना सुरुवातीला लाखांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं आहे. या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी राहुल राऊतविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील शासकीय धान गोडाऊनमधून तांदूळ चोरीला गेल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. पवनी तालुक्यातील आमगाव येथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. या कारवाईत एका धान व्यापाऱ्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. शासकीय साठ्यातील तांदूळ चोरीला गेल्याच्या या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

पवनी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत चोरीचा तांदूळ आणि तो वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेलं पिकअप वाहन जप्त केलं आहे. पोलिसांच्या कारवाईत तांदळाचे ७२ कट्टे ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये धान व्यापारी नंदकिशोर कावळे (४३), मोहित वाघमारे (२०), रुपेश शेंडे (३८), विलास शेंडे (३३) आणि वैभव मुंडले (२३) यांचा समावेश आहे. या चोरीत आणखी किती तांदूळ लंपास करण्यात आला आणि या प्रकरणात इतर कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

अमोल खुणे यांच्यावर 20 जणांकडून जीवघेणा हल्ला, बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल

विशेष म्हणजे, भंडारा जिल्ह्यातील शासकीय धान गोडाऊनमधील चोरीचं हे काही दिवसांतील दुसरं प्रकरण आहे. मागील आठवड्यात साकोली येथील धान गोडाऊनमधून तांदळाचे ३६१ कट्टे चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी ११ जणांना अटक केली होती. त्यानंतर आता पवनी तालुक्यातील आमगाव येथील चोरी उघडकीस आल्यानं शासकीय धान साठ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दुसरीकडे, भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बेला गावाजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या करण मलेवार (२०) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पाठीमागून आलेल्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारनं दुचाकीला जोरदार धडक दिल्याने करण आणि राहुल गभणे (२४) हे दोघे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आलं. मात्र, करणचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर राहुल गभणे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बेला गावाच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम संथगतीनं सुरू आहे. या परिसरात नाल्याचं काम सुरू असताना रस्त्यावर खड्डा पडला होता. याच ठिकाणाहून दुचाकी जात असताना पाठीमागून आलेल्या कारनं तिला धडक दिल्याची माहिती आहे. या अपघातप्रकरणी भंडारा पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version