माढा : “भारतीय जनता पक्षाकडे मी माढा लोकसभा निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी करणार आहे. माढ्यातून लढण्यासाठी मी इच्छुक आहे. कारण या मतदारसंघात मी पक्षाचे काम केलेले आहे” असे म्हणत भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत घोषणा केली. यापूर्वी मोहिते पाटील हे केवळ दावा करत होते. मात्र आज त्यांनी केलेल्या या घोषणेमुळे माढ्याचे भाजपचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर पक्षातूनच पहिले आव्हान उभे राहिले आहे. (BJP leader Dhairyasheel Mohite Patil has announced to contest the election from Madha)
काय म्हणाले धैर्यशील मोहिते पाटील?
भारतीय जनता पक्षाकडे मी माढा लोकसभा निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी करणार आहे. माढ्यातून लढण्यासाठी मी इच्छुक आहे. कारण या मतदारसंघात मी पक्षाचे काम केलेले आहे. कार्यकर्त्यांचीही तशी इच्छा आहे. कार्यकर्ते आता ऐकण्याच्या बाहेर गेले आहेत. निवडणूक लढवण्याची आमची संपूर्ण तयारी आहे. मी गेली साडेतीन वर्षे सर्वांच्या संपर्कात आहे. पक्षाच्या मागे लागून उमेदवारी पदरात पाडून घेणार आहे. मी लोकसभेची निवडणूक लढवणारच आहे, असा निर्धार मोहिते पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
धैर्यशील मोहिते पाटील हे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. गत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत घडामोडी आणि जिल्हा परिषदेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवत धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला राम-राम करत भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्यापाठोपाठ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रणजीतसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत दोन्ही मोहिते पाटील बंधूंनी भाजप उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.
मोहिते – पाटील यांनी ताकद लावल्याने माढा मतदार संघात प्रथमच भाजपला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही भाजप आमदार राम सातपुते यांना निवडून आणले होते. त्यानंतरच्या काळात झालेल्या पुणे पदवीधर निवडणुकीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी ठळक कामगिरी केली होती. या सगळ्यामुळे 2020-21 मध्ये भाजपने माढा लोकसभेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली.
दरम्यान, या मतदारसंघात अद्याप भाजपाचा उमेदवार ठरलेला नाही. तरीदेखील आतापासूनच पक्षाला येथे अंतर्गत वादाला तोंड द्यावे लागत आहे. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या समर्थकांत जोरदार वाक् युद्ध सुरू झाले आहे. सोशल मीडियात तर एकमेकांविरोधातील पोस्टचा पूर आला आहे. अशा परिस्थितीत तिकीट कुणाला द्यायचं हा मोठा प्रश्न भाजप पक्षश्रेष्ठींसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे तिकीट वाटपात भाजप नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार हे मात्र नक्की.